राष्ट्रवादीकडून इन्कमिंगचा धडाका ; अवघ्या दोन महिन्यात तब्बल पाच माजी आमदारांच्या हाती घड्याळ

NCP - Sharad Pawar

मुंबई : जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपला (BJP) रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. इतकेच नाही तर राष्ट्रवादीकडून तितक्याच उत्साहाने आणखी चार माजी आमदारांचेही पक्षात स्वागत झाले. गेल्या दोन महिन्यात राष्ट्रवादीने पक्षप्रवेशाचा अक्षरशः धडाका लावला आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण एकनाथ खडसे, सीताराम घनदाट, उदेसिंग पाडवी अशा तब्बल पाच माजी आमदारांनी नजीकच्या काळात ‘घड्याळ’ हाती बांधले.

नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी 9 सप्टेंबरला राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. गेल्या वर्षभरात पाडवी यांचा भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी असा राजकीय प्रवास झाला आहे.

परभणीचे माजी आमदार सीताराम घनदाट यांनी 16 सप्टेंबरला राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला. सीताराम घनदाट हे अभ्युदय बँकेचे अध्यक्ष आहेत. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून ते 2009 मध्ये आमदार होते. यंदाच्या निवडणुकीतही ते अपक्ष रिंगणात उतरले होते, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

रत्नागिरीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांची 30 सप्टेंबरला पक्षात घरवापसी झाली. राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर शेकाप-भाजप-काँग्रेस असा झालेला त्यांचा राजकीय प्रवास अखेर वर्तुळाकृती होऊन राष्ट्रवादीतच पूर्ण झाला.

राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर कदम यांनी 1999 मध्ये काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीकडून 2004 मध्ये ते चिपळूणचे आमदार झाले. मात्र भास्कर जाधव यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर दोघांमध्ये खटके उडू लागले होते.

कोल्हापुरातील हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून जनसुराज्य पक्षाचे माजी आमदार राजीव आवळे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

सांगलीतील खानापूर-आटपाडीचे माजी आमदार आणि काँग्रेसला रामराम ठोकलेले ज्येष्ठ नेते सदाशिव पाटील यांनी फेब्रुवारीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. सदाशिव पाटील हे खानापूर आटपाडी मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यापूर्वी विटा नगरपालिकेचे नगराध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER