पोलीस भरतीत ३३ टक्के महिलांचा समावेश करा, शिवसेना महिला आमदारांची मागणी

Anil Deshmukh - Manisha Kayande

मुंबई : महाराष्ट्र (Maharashtra) राज्यामध्ये पोलीस दलात जवळपास २ लाख २२ हजार पोलीस आहेत. त्यामध्ये केवळ २९ हजार महिला पोलिस आहेत. खरं तर ३३ टक्के आरक्षण गृहीत धरले तर सुमारे ७० हजाराच्यावर महिला पोलीस (Female Police) असणे आवश्यक आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी पोलीस दलात ३३ टक्के महिला पोलिसांची भरती करावी, अशी मागणी शिवसेना आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याकडे केली आहे.

सामान्य महिला जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जाते त्यावेळेस तेथे तक्रार नोंदवण्यासाठी महिला पोलीस असणे व्यथा मांडण्यासाठी अधिक सोयीस्कर होते. पुरुष अधिकाऱ्यांसमोर आपलं गाऱ्हाणं मांडणे खूप कठीण जातं आणि महिला आणि पुरुष यामधील संवेदनशीलता पाहिली तर निश्चितच महिलांमध्ये संवेदनशीलता अधिक असते हे आपल्याला विसरून चालणार नाही. त्यामुळे पोलिस दलात अधिकाधिक महिला असणं आवश्यक आहे, असं कायंदे म्हणाल्या.

महिला पोलिसांच्या सोयीसुविधा त्यांच्या कामाच्या वेळा व त्यांच्यासाठी असलेले शौचालय याचीदेखील कमतरता आहे आणि त्यामुळे त्यांच्या कामावर त्याचा परिणाम होत असतो. पोलिसांसाठी फिरती शौचालय असण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर सुमारे आठ ते दहा महिन्यापासून महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त आहे. हे तातडीने भरण्यात यावे, असे आवाहनही त्यांनी गृहमंत्र्यांकडे केले.

तसेच विभागीय स्तरावर महिला आयोग कार्यालय असणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून महिलांना तिथे आपली व्यथा मांडणे अधिक सोयीस्कर होईल आणि असा निर्णय देखील सरकारचा झालेला आहे, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. महिला पोलिसांना समुपदेशन करण्याच्या पद्धती किंवा समुपदेशन कसे करावे याबाबत विशेष प्रशिक्षण देण्याची गरज आहे, असेही कायंदे यांनी म्हटले.

आमदार कायंदे यांच्या निवेदनावर गृहमंत्री देशमुख म्हणाले, नवीन १२ हजार पोलिसांची भरती होणार आहे यामध्ये महिलांची संख्या ३३ टक्के होईलच याची आम्ही काळजी घेऊ व इतर मागण्यांवर आम्ही लवकरात लवकर कार्यवाही करू.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER