पालघर येथे साधूंची झालेली हत्या अफवेमुळे; गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

Anil Deshmukh

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या गडचिंचले येथे जमावाकडून तीन साधूंची जमावानं हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर राज्यात व देशातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तसेच या प्रकरणी शंभराहुन अधिक आरोपींना अटक कऱण्यात आली होती. या घटनेचा तपास राज्य सरकारनं सीआयडीकडे दिला होता. केवळ अफवा पसरल्यामुळे ही घटना घडली होती, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी आज दिली.

गृहमंत्री देशमुख म्हणाले, ईतर राजकीय पक्षांनी घटनेच्या मुळाशी न जाता राजकीय रंग देऊन जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न त्यावेळी केले. हिंदू-मुस्लीम, हिंदू-ख्रिश्‍चन यांच्यात तणाव कसा निर्माण होईल, असेही प्रयत्न काही राजकीय पक्षांकडून करण्यात आले. आज घटनेप्रकरणी सीआयडीनं न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. त्यामध्ये ही घटना केवळ अफवा पसरविल्यामुळे घडल्याचे म्हणण्यात आले आहे. पोलीस उपअधीक्षक आणि तपास अधिकारी विजय पवार यांनी डहाणू येथील न्यायालयात १२६ आरोपींविरोधात ४९५५ पानांचं आरोपपत्र दाखल केलं. सीआयडीनं आरोपपत्र दाखल केल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याविषयी अधिक माहिती दिली.

“तीन महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेत २ साधू आणि १ ड्रायव्हर अशा तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याप्रकरणाचा सर्व तपास सीआयडीकडे देण्यात आला होता. त्यानुसार त्यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. सीआयडीच्या तपासातून ही घटना केवळ अफवेतून घडली असल्याचं स्पष्ट झालं आहे. सीआयडीनं या प्रकरणात ८०८ लोकांची सखोल चौकशी करून १५४ जणांना अटक केली आहे. तसेच पुढील कार्यवाही न्यायालयात चालेलं,” असं अनिल देशमुख म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER