विधानमंडळ सचिवालयाच्या कक्षाचे नागपूर येथे ४ जानेवारीला उद्घाटन

Nagpur Vidhan Bhavan

नागपूर : महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या कक्षाचे उद्घाटन सोमवार, ४ जानेवारीला नागपूर येथील विधान भवनात होत आहे.

विधान सभेचे अध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी दीड वाजता राष्ट्रकुल संसदीय मंडळ कक्षात (पहिला मजला, जुनी इमारत) हा उद्घाटन समारंभ होणार आहे.

महाराष्ट्र विधानमंडळाच्या प्रतिवर्षी नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनानंतर विधानमंडळ सचिवालयाचे कार्यालय बंद करण्यात येऊन विधान भवन मुंबई येथे सुरु करण्यात येते. नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वगळता उर्वरित कालावधीत येथील कार्यालय कामकाजासाठी बंद असते.

विधानपरिषद सभापती व विधानसभा अध्यक्ष यांचा समावेश असलेल्या मंडळाने विधान भवन नागपूर येथील कार्यालय वर्षभरासाठी सुरु करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार नागपूर येथे विधानमंडळ सचिवालयात नव्याने कक्ष सुरु करण्यात आला आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करुन सभारंभास उपस्थित रहावे, असे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी कळविले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER