अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखडा कामाचे उद्या उद्घाटन

Ambabai Temple - Satej Patil

कोल्हापूर : श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास कामांसाठी अखेर मुहूर्त मिळाला आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत असलेल्या अत्याधुनिक बहुमजली पार्किंगचे भूमिपूजन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते रविवारी होणार आहे. सात कोटी 86 लाख खर्चुन मंदिर परिसरातील सरस्वती टॉकीजजवळ पार्किंगसाठी इमारत साकारली जाणार आहे. टप्प्याटप्प्याने आराखड्यासाठी राज्य शासनाकडून निधी मिळणार आहे.

सुमारे 2200 चौरस मीटर जागेत तीन मजली पार्किंगची इमारत असेल. यात स्मार्ट पार्किंग सिस्टीम असणार आहे. 140 चारचाकी व 145 दुचाकीसाठी पार्किंग असणार आहे. वाहनचालकाने टोकन घेतल्यानंतर त्याला कोणत्या मजल्यावर पार्किंगसाठी जागा उपलब्ध आहे हे तेथेच कळणार आहे. ‘बुक माय शो’च्या धर्तीवर महापालिका अँप डेव्हलप करणार आहे. देशातील कोणत्याही वाहनचालकाला त्या अँपवरून पार्किंगचे बुकिंग करता येणार आहे.

दिव्यांगांसाठी स्वतंत्र पार्किंगची सोय असणार आहे. संपूर्ण पार्किंगच्या इमारतीसाठी फक्त एकच कर्मचारी असेल. भविष्यात सर्वत्र इलेक्ट्रिक कार होण्याची शक्यता असताना त्यासाठी लागणारे चार्जिंग स्टेशनही पार्किंग इमारतीत बांधले जाणार आहे. तसेच स्वच्छतागृह, डॉर्मिटरी व लॉकर्सचीही व्यवस्था असणार आहे.

250 कोटींच्या तीर्थक्षेत्र आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यासाठी 65 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. दरम्यानच्या कालावधीत देशभर जीएसटी लागू झाला. त्यामुळे 65 कोटींच्या आराखड्याची किंमत 80 कोटीवर गेली. 31 जानेवारी 2018 ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने आराखड्याला तत्त्वतः मान्यता दिली. तसेच आराखड्यात स्मार्ट पार्किंग प्रणाली व ज्येष्ठ नागरिकांसाठी ई-कार्ड सुविधेचा समावेश करण्याची सूचना समितीने केली होती.

त्यानुसार महापालिका प्रशासनाने आराखड्यात बदल करून त्या बाबींचा समावेश केला. मात्र आराखड्याची किंमत सात कोटींनी वाढली. शिखर समितीने तत्त्वतः मान्यता दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एस्टिमेट तपासून घेण्याचीही सूचना करण्यात आली होती. त्यानुसार महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता यांच्याकडून एस्टिमेट तपासून घेतले. ऑगस्ट 2018 मध्ये राज्याच्या मुख्य सचिवांना त्यासंदर्भातील प्रस्ताव पाठविण्यात आला. परंतु प्रधान सचिव यांनी सात कोटींचे काय? असा प्रश्न उपस्थित केला होता. महापालिका प्रशासनाने राज्य शासनाने 80 कोटी दिल्यास उर्वरित सात कोटी स्वनिधीतून देण्यास महापालिका तयार असल्याचे पत्र 28 सप्टेंबर 2018 ला दिले होते होते. 21 जून 2019 ला महापालिकेकडे 7 कोटींचा निधी वर्ग झाला होता.