जि.प.त भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी नवे समीकरण

BJP

मुंबई :‘आम्ही दोघे एकत्र येऊन सत्ता स्थापन होतेय अशा ठिकाणी अन्य कुणाची मदत घेण्याचा प्रश्न नाही. अशा जिल्ह्यांबाबत उस्मानाबाद व आणखी एखादी जिल्हा परिषद सोडून आमची आघाडी जवळपास नक्की झाली आहे, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. आम्ही एकत्र येऊनही सत्ता मिळत नाही अशा ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र यावे आणि काँग्रेसने मतदानात भाग न घेता अप्रत्यक्षपणे पाठिंबा द्यावा, असे नवीन समीकरण आता समोर आले आहे.

राज्यातील जिल्हा परिषदा भाजपमुक्त ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी मिळून जिथे सत्ता स्थापन करायची आणि हे दोघे एकत्र येऊनही जिथे सत्ता मिळत नाही तिथे राष्ट्रवादीने शिवसेनेला बरोबर घ्यायचे आणि काँग्रेसने बाहेरून वा तटस्थ राहून पाठिंबा द्यायचा, असे झाल्यास बीड, जालना, हिंगोली, यवतमाळ, बुलडाणा, नाशिक, कोल्हापूर व सांगलीमध्ये भाजपाला सत्तेपासून दूर ठेवता येईल. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या या खेळीला शिवसेना काय प्रतिसाद देणार हे महत्त्वाचे आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्तेची वाट भाजपाने सुकर केली. ठाण्यात शिवसेनेची एकहाती सत्ता आली आहे. अन्य आठ महापालिकांमध्ये सत्ता भाजपाकडे असेल हेही निश्चित आहे.