युपीएच्या काळात देशाची अर्थव्यवस्था स्फोटकांच्या ढिगा-यावर होती : मोदी

PM Modi1

नवी दिल्ली: काँग्रेसवर जोरदार निशाणा साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, संयुक्त प्रगतीशील आघाडी (युपीए) सरकाने देशाची अर्थव्यवस्था भुसुरुंगावर नेऊन ठेवली होती. आज दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर इंडियन पोस्ट पेमेंटस बँकेचे (आयपीपीबी) उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते.

नॉन परफॉर्मिंग असेटच्या (एनपीए) निमित्ताने निर्माण झालेल्या संकटाला मोदींनी युपीए सरकारला जबाबदार धरले. ‘नामदारांनी’ फोन बँकिंगच्या माध्यमातून लाखो करोड रुपये बड्या लोकांना वाटले, असा गंभीर आरोप मोदींनी केला.

स्वातंत्र्यानंतर २००८ पर्यंत देशातील सर्व बँकांनी मिळून १८ लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरीत केल्याचा आरोप करताना ते म्हणाले, २००८ नंतर यूपीए सरकारच्या काळात सहा वर्षांत ही रक्कम ५२ लाख कोटींवर गेली. आधीच्या कर्जाच्या रक्कमेच्या तुलनेत केवळ सहा वर्षांच्या काळात दुप्पटीपेक्षा अधिक कर्ज देण्यात आले. दरम्यान, देशभरातील सर्व १.५५ लाख पोस्ट कार्यालये ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत आयपीपीबी प्रणालीशी जोडली जाणार आहेत.