सामनाच्या मुलाखतीत पवारांनी उद्धव ठाकरेंवरच टीका केली – नारायण राणे

मुंबई :- शरद पवार (Sharad Pawar) यांनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत देशातील व राज्यातील परिस्थितीवर भाष्य केलं होतं. त्याचबरोबर विरोधी बाकांवरील भाजपा व देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही टीका केली होती. या मुलाखतीत शरद पवार यांनी केलेल्या टीकेला भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी उत्तर दिलं आहे. राज्यात कोरोनाची परिस्थिती अधिकच गंभीर होत असताना केवळ राजकीय हेतून प्रेरित असलेली संजय राऊत आणि शरद पवारांची मुलाखत होती, केवळ विरोधकांवर टीका करण्यासाठी मुलाखत होती, भाजपासोबत निवडून यायचं आणि सत्तेत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत बसायचं ही शिवसेनेची बेईमानी आहे अशा शब्दात राणे यांनी शिवसेनेचा (Shivsena ) समाचार घेतला.

ही बातमी पण वाचा : एक शरद आणि शिवसेनेचे सगळे गारद- नारायण राणे

आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे म्हणाले की, संजय राऊत (Sanjay Raut) हे खासदार शिवसेनेचे आहेत. मात्र काम पवारांचे करतात. संजय राऊत शिवसेनेचे खासदार असले तरी शिवसेनेचे नाहीत हे शिवसैनिकांनाही माहिती आहे. राज्य सरकारच्या गलथान कारभारापासून लक्ष विचलित करण्यासाठी पवारांची मुलाखत घेण्यात आली. घरात बसून राज्य चालवता येत नाही. शिवसेनेमुळे भाजपाचे १०५ आमदार आले हे कोणाला खरं वाटेल?, असा प्रश्नही नारायण राणे (Narayan Rane) यांनी उपस्थित केला.

तसेच देवेंद्र फडणवीस हे शांत स्वभावाचे, मी पुन्हा येईन या शब्दाचा अर्थ कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी केले होते, त्यात घमेंड कुठून आली? २०१४ आणि २०१९ मध्ये शिवसेनेचे खासदार, आमदार निवडून आले ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे, महाराष्ट्राचे खरे शत्रू शरद पवार, शिवसेनाप्रमुखांचे विधान अशी हेडिंग सामनाने दिली होती, आता त्यांचीच मुलाखत घेऊन शिवसेनेकडून स्तुतीसुमने उधळली जात आहे. सामनातून आजपर्यंत शरद पवारांवर अनेकदा टीका करण्यात आली पण आता पवारांचे गोडवे सामनातून गायले जात आहेत. शिवसेनेची आधीची भाषा आणि आताची भाषा पाहिली तर ते समजून येईल, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असते तर कदापि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले नसते.

सामनातूनच उद्धव ठाकरेंवर टीका करतात, महाराष्ट्र सरकारमध्ये संवाद नाही असं स्पष्टपणे शरद पवार म्हणाले. ही मुलाखत राज्याच्या गंभीर परिस्थितीकडून लक्ष विचलित करण्यासाठी घेतलेली आहे, देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यासाठी घेतलेली मुलाखत आहे असा आरोप नारायण राणेंनी केला.

दरम्यान, देशात अन्य राज्यांपेक्षा सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहे, सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रात होत आहेत. ९ लाख भारतात रुग्ण त्याच्या एक तृतियांश रुग्ण राज्यात आहे, रुग्ण जास्त आणि मृत्यू गाठला त्याबद्दल शरद पवारांना मुलाखतीत प्रश्न का विचारण्यात आला नाही, शरद पवारही त्याबद्दल काहीही बोलले नाहीत, लोकं मृत्युमुखी पडतायेत आणि हसत-खेळत संजय राऊत मुलाखत घेत आहेत. या परिस्थितीची नैतिक जबाबदारी कोणाची आहे? याबद्दल कोणी बोलत नाही, सध्या राज्य कौरव चालवत आहे, लवकरच कौरवांचा राज्य जाईल असा दावा नारायण राणेंनी यावेळी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER