रिश्तेमे तो हम तुम्हारे…

Shailendra Paranjapeबसमधून दगड मारला तर तो तीन चार विद्वानांना लागतो आणि मग जमिनीवर पडतो, असं विसाव्या शतकातल्या पुण्याबद्दल सांगितलं जायचं. मागच्या शतकात विविध क्षेत्रात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक कमावलेले लोक पुण्यामधे (Pune) होते. ती परंपरा एकविसाव्या शतकातही सुरू राहिली. अर्थात, आता दगड तीन चार नाही तरी एखाद्या विद्वानाला लागू शकतो, काही वेळा कुणालाच न लागता जमिनीवरही जाऊ शकतो.

काळाबरोबर पुणं बदललं, मुंबईच्या पावलावर पाऊल टाकत कॉस्मो-पॉलिटन होऊ लागलं. त्यामुळेच पुण्याच्या बदललेल्या संस्कृतीचा विचार करताना इतिहासातल्या धुरिणांचं योगदान लक्षात घ्यावं लागतं, आपण नेमके कुणाच्या खांद्यावर उभे आहोत, हे लक्षात घेऊनच आपली क्षितिजं विस्तारावी लागतात. पण राजकारण आणि तार्किक मांडणी यांचं फारसं नातं असल्याचं सध्या तरी दिसून येत नाही.

त्यामुळेच सध्या पुण्यात जी काही विधानं राजकीय पटलावर केली जाताहेत, ती बघता आता पुण्यामधे बसमधून दगड मारला तर विद्वानांना लागायचा तर प्रश्नच येत नाही पण चुकून कुणा राजकारण्याला लागला तर लोकांनाही बरं वाटेल, असा राजकारणाचा आणि राजकारण्यांचा प्रवास झालाय.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना उद्देशून राज्याचे माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (BJP) सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एक विधान केलंय. पाटील पवारांना म्हणतात, आम्ही तुमचे बाप आहोत…पुणे महापालिकेत सत्ता मिळवण्याचं स्वप्न बघू नका….

पुणे महापालिकेत गेल्या पन्नास वर्षात भारतीय जनता पक्ष स्वबळावर पहिल्यांदाच सत्तेत आलेला आहे. त्यामुळेच महापौरपदासह स्थायी समिती अध्यक्षपदही भाजपाकडेच आहे. पण मुळात चंद्रकांत पाटील महाराष्ट्रातल्या राजकीय दृष्टीनं सर्वशक्तीमान कुटुंबातल्या अजित पवारांना (Ajit Pawar) असं कसं म्हणू शकले, असा प्रश्न काहींना पडेल.

पवार कुटुंबात सध्या शरद पवार यांच्या रूपाने राज्यसभेचे एक खासदार, सुप्रिया सुळे यांच्या रूपाने लोकसभेच्या एक खासदार, अजित पवार आणि रोहित पवार यांच्या रूपाने दोन विधानसभा आमदार आहेत. त्या तुलनेत चंद्रकांत पाटील पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून गेलेत. तेही त्यांच्या कोल्हापूरमधून नव्हे तर सुरक्षित असा कोथरूड मतदार संघातून. तरीही आम्ही तुमचे बाप आहोत, असं पाटील का म्हणाले असतील…

पुण्याच्या महापालिकेचा गेल्या चाळीस पन्नास वर्षांचा इतिहास पाहिला तर शरद पवार यांनी पुण्यातून महाविद्यालयीन शिक्षण घेतलेलं असलं तरी महापालिका राजकारणात मात्र त्यांना खूप मोठं स्थान नव्हतं. सत्ता कॉँग्रेसची असली तरी पालिकेत वसंतदादा गट होता, त्यानंतर जयंतराव टिळक, विठ्ठलराव गाडगीळ यांचे खंदे समर्थक अनुयायी म्हून कारकीर्द सुरू करून नेते झालेल्यांचे टिळक गट, गाडगीळ गट होते. ते बहुतांश पवार यांचे विरोधक होते.

त्यामुळेच बारामती लोकसभा मतदारसंघाला जोडलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सत्तास्पर्धेत पवार सक्रीय झाले पण पुण्यात त्यांनी सुरेश कलमाडींवर सगळं राजकारण सोडून दिलं. थेट राजीव गांधी यांची मैत्री असलेल्या कलमाडी यांनी स्वतःचं स्थान, साम्राज्य उभं करून पुणे महापालिकेवर सत्ता गाजवली तेव्हा गाडगीळ-टिळक गटाचेही बहुतांश नेते कलमाडींचे झाले. त्यामुळेच कलमाडी यांच्या विरोधात पवार यांना थेट भाजपा-शिवसेना यांच्याबरोबर राजकीय समेट करून पुणे पँटर्न करून महापालिकेत सत्ता आणावी लागली.

शेजारच्या पिंपरी चिंचवडमधे स्वबळावर सत्ता आणि अजित पवार म्हणतील ते होईल, अशी स्थिती आणू शकलेले पवार पुण्यात ते करू शकले नाहीत. त्यामुळेच त्याबद्दलचा सल अजित पवार यांच्या बोलण्यातून अनेकदा जाणवतो. पुण्यात कॉँग्रेसची पाळंमुळं खोलवर रुजलेली आहेत, भाजपा सध्या भक्कम आहे, पवारांची राष्ट्रवादी पुणे शहराचा अध्यक्ष कोणाला करावं, या चिंतेतच बऱ्याचदा असते. त्यामुळेच आम्ही तुमचे बाप आहोत, इतकं आव्हान चंद्रकांत पाटील अजित पवारांना देऊ शकले आहेत.

पुण्यात टिळक-आगरकर यांचे वाद, ना सी फडके आचार्य अत्रे वग्युद्ध, जेधे-गाडगीळ यांची ब्राह्मणेतर चळवळ गाजली. आता राजकीय चर्चेचा स्तर अशा पातळीवर आलाय की बसमधून दगड मांरले तर बाप लोकांनाच लागतील.

Disclaimer :- ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER