
नाशिक :- ईडीच्या (ED) नोटीस प्रकरणावरून शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) चांगलाच वाद रंगला आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये शिवसेना भाजपला आतापर्यंतचा सर्वांत मोठा हादरा देण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या उपस्थितीत गुरुवारी भाजपचे (BJP) दोन मोठे नेते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत हे गुरुवारी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या उपस्थितीमध्ये भाजपातील दोन बडे नेते शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता आहे. शिवसेनेत येणारे दोनही नेते भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे संजय राऊत यांच्या दौऱ्यात भाजपमध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. मागील महिन्यात २१ डिसेंबर रोजी माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला राम राम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता. बाळासाहेब सानप यांच्या भाजपप्रवेशामुळे शिवसेनेला धक्का मानला जात होता. परंतु, सानप यांच्या भाजपमध्ये प्रवेशामुळे भाजपमध्येच फूट पडल्याचे पाहण्यास मिळाले होते. भाजपमधील अनेक नेत्यांनी सानप यांना भाजपमध्ये पुन्हा प्रवेश देऊ नये अशी मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडे केली होती. पण, सर्वांचा विरोध डावलून सानप यांना पक्षात घेण्यात आले होते. सानप यांच्या घरवापसीमुळे नाशिक, धुळे जिल्ह्यातील शेकडो भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले होते.
सानप यांच्या भाजपप्रवेशाचा बदला घेण्यासाठी आता शिवसेनेनं रणनीती आखली आले आहे. त्यामुळे गुरुवारी नाशिकमध्ये संजय राऊत यांच्या उपस्थितीत भाजपचे कोणते नेते सेनेत प्रवेश करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ही बातमी पण वाचा : शिवसेनेकडून औरंगाबाद नामांतराच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष, भाजपचा आरोप
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला