आयपीएलची नाव गर्तेत, खेळाडू घेताहेत माघार; अभिनव बिंद्राने सुनावले खडे बोल

Abhinav Bindra

कोरोनाच्या (Corona) साथीतही बायोबबलमध्ये व प्रेक्षकांशिवाय आयपीएलचे (IPL) सामने सुरू असले तरी वाढत्या प्रकोपामुळे आयपीएलची नाव गर्तेत आहे. बरेचसे परदेशी खेळाडू आयपीएलमधून काढता पाय घेत आहेत. त्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे ऍडम झम्पा (Adam Zampa), केन रिचर्डसन (Kane Richardson) आणि राजस्थान रॉयल्सचा अँड्र्यू टाय (Andrew Tye) यांचा समावेश आहे. टायच्या म्हणण्यानुसार आणखी काही खेळाडू आयपीएलमधून बाहेर पडण्याच्या मन:स्थितीत आहेत. इकडे आपला अष्टपैलू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याच्या कुटुंबात कोरोनाने शिरकाव केला असल्याने त्यानेसुद्धा माघार घेतली आहे.

दुसरीकडे देशात हजारो लोक या आजाराने मरत असताना आणि करोडो बाधित असतानाही आयपीएलचे सामने सुरू असल्याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यात ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा (Abhinav Bindra) यांचाही समावेश आहे. याबाबत आपली नाराजी स्पष्ट करताना बिंद्रा यांनी म्हटले आहे की, सभोवताली काय घडतेय याकडे क्रिकेटपटूंनी दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांनी अंध व बधिरांसारखे राहू नये तर त्यांनी सामाजात योग्य संदेश पोहचवावा आणि या महामारीवर मात करण्यासाठी आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा आहे.

बिंद्रा यांनी म्हटले आहे की, कोरोनाने लोकांच्या आयुष्यात किती दुःख आणले आहे ते बघून मी अक्षरशः हवालदिल झालो आहे. आपली वैद्यकीय व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. याचा दोष दवाखान्यांना किंवा तेथे काम करणारांना देता येणार नाही. ही मंडळी तर खरे हिरो आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर आहेच; पण आरोग्य सुविधांच्या क्षेत्रात आपण अधिक गुंतवणूक करण्याची गरज आहे. मात्र या समस्येने अनेक मुद्दे समोर आले आहेत. बेफिकिरी आणि अहंकार समोर आला आहे. तसेच सोशल मीडियावर लोक कसे एकमेकांच्या मदतीला पुढे येत आहेत तेसुद्धा दिसून आले आहे. काही आपली मदत वा सेवा उघडसुद्धा करत नाहीत; पण आपण सर्वांनी सर्व प्रकारचे मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत योगेश्वर दत्तने कुंभमेळा आणि समाजातील काही घटकांबद्दल जी मते व्यक्त केली तशा प्रकारची मते व्यक्त करायची ही वेळ नाही.

आयुष्याप्रमाणे खेळांतही काही अपवाद सोडले तर पुनरागमनाची संधी नसते. पण समाजासमोर जे आदर्श मानले जातात अशा खेळाडूंनी ह्या प्रकारे आपली मते व्यक्त करणे योग्य नाही.

भारतातील खेळाडू राष्ट्रीय मुद्द्यांवर किंवा प्रशासनाविरोधात बोलत नाहीत ही ओरड बऱ्याच काळापासून आहे. खेळाडूंना मते मांडण्यापासून का रोखते ते मला कळत नाही, कदाचित परिणाम काय होतील याची भीती असावी; पण खेळ हे गुणवत्तेवरच होतात, त्यात वशिलेबाजी किंवा आरक्षण नसते. त्यामुळे खेळाडूंना अशी भीती का वाटावी ते कळत नाही. तुमच्यात गुणवत्ता असेल तर तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही. आणि खेळाडूंच्या यशाचा लोक सन्मान करतात म्हणून समाजातील इतर घटक जर झटत असतील तर खेळाडूंनीही आपापल्यापरीने त्यांच्या मदतीसाठी पुढे आले पाहिजे.

याच पार्श्वभूमीवर आयपीएलचा मुद्दा येतोय. खरं सांगायचं तर मी सध्या कोणताही खेळ बघायला वेळ देऊ शकत नाही. आयपीएलची मी माहिती ठेवत नाही. पण लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचे एक चांगले कारणही आयपीएलकडे आहे. अशा स्थितीतही ते खेळू शकताहेत यावरून खेळाडूंनी ते किती खास आहे हे ध्यानात घ्यावे. म्हणून आयपीएलमध्ये व्यस्त असलेल्या सर्वांनी पुढे येऊन किमान जनजागृती करावी. लोकांना आरोग्य व सुरक्षेचे महत्त्व पटवून द्यावे. मी जर बीसीसीआयचा अध्यक्ष असतो आणि मला अधिकार असते तर मी कोरोनाविरुद्धच्या लढाईत लसीकरण वा इतर गोष्टींसाठी आर्थिक मदत केली असती.

क्रिकेटपटू आणि अधिकारी बबलमध्ये सुरक्षित राहात असले तरी त्यांनी आजूबाजूच्या गोष्टींबाबत आंधळ्या वा बहिऱ्यासारखे राहून चालणार नाही. सामने सुरू असताना स्टेडियमबाहेर अँब्युलन्सेस दवाखान्यांकडे धावत असतात असे चित्र आहे म्हणून आपण खेळांचा महोत्सव साजरा करणे टाळायला हवे, अशी स्पष्ट मते अभिनव बिंद्राने मांडली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button