बाळासाहेब थोरात यांच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून गोंधळ; थोरातांनी झापले

Balasaheb Thorat

अहमदनगर :- राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अकोले तालुक्यात झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने चांगलाच गोंधळ घातल्याची घटना बघायला मिळाली. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. अहमदनगरमध्येही मागील काही दिवसांमध्ये कोरोनाचे थैमान सुरू झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी अकोले तालुक्यात लोकप्रतिनिधींसोबत कोरोना आढावा बैठक घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने रेमडेसिवीरच्या तुटवड्यावरून बैठकीत आक्रमक रूप धारण करत चांगलाच गोंधळ घातला.

बाळासाहेब थोरात नागरिकांचे प्रश्न ऐकून घेत असताना राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्याने मोठ्या आवाजात प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटेदेखील हजर होते. यावेळी त्यांनीही कार्यकर्त्याला हात जोडून समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्त्याकडून प्रश्नांची सरबत्ती सुरूच  होती.

संबंधित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यानंतर बैठकीला उपस्थित लोकांनी त्याला शांत बसण्यास सांगितले. मात्र, मी काय चुकीचं बोलतो आहे? असा उलटप्रश्न करत त्याने आपलं बोलणं सुरूच ठेवलं. अकोले तालुक्याला रेमडेसिवीर इंजेक्शन कमी का? असा प्रश्न या कार्यकर्त्यांकडून विचारला जात होता. या गोंधळानंतर स्वतः आमदार किरण लहामटे यांनी या आक्रमक कार्यकर्त्याला खाली बसण्यास सांगितले. मात्र, तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. यानंतर या ठिकाणी उपस्थित इतर नागरिकांनी आम्हीही येथे समस्या मांडायला आलोय, आम्हाला आमचे प्रश्न मांडू द्या, गोंधळ करू नका, असं मत व्यक्त केलं. मात्र, बैठकीतील गोंधळ सुरूच राहिल्याने अखेर या कार्यकर्त्याला बैठकीतून बाहेर काढण्यात आले.

संबंधित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांच्या भोळेपणाचा गैरफायदा घेऊ नका, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांच्यावर संताप व्यक्त केला. यावर आमदार किरण लहामटे यांनी कार्यकर्त्यापुढे थेट हात जोडल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे या प्रकाराने संतप्त झालेल्या बाळासाहेब थोरात यांनीदेखील या कार्यकर्त्याला चांगलंच झापलं. तुझं जितकं वय आहे तितकं माझं राजकारण आहे. तुम्हाला संवेदना आहेत आणि आम्हाला नाही आहेत का? असा प्रश्नही थोरातांनी त्याला विचारला. आम्ही ऐकून घेतो म्हणजे काहीही बोलायचं असं नाही, असंही त्यांनी सुनावलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button