सांगलीत भाजपने केला राज्य सरकारचा निषेध

In Sangli-BJP agitation

सांगली : संपूर्ण देशाबरोबर महाराष्ट्रही कोरोनाशी लढत देत आहे. परंतु दुर्दैवाने कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात सार्वाधिक आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा नाकर्तेपणा आणि नेतृत्वाचे होणारे दुर्लक्ष याचा निषेध म्हणून सांगलीत शुक्रवारी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर भाजपने आंदोलन केले. यावेळी महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.

ही बातमी पण वाचा:- ‘’उद्धवा अजब तुझे निष्फळ सरकार”; महाराष्ट्र बचाव आंदोलनात खडसेंची भूमिका

कोरोनासंदर्भात केंद्र सरकारने ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या, त्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. संपूर्ण जग कोरोनाशी मुकाबला करीत असताना महाराष्ट्रातील सरकार मात्र राजकारण करण्यातच मग्न आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा काळात प्रत्येक जिल्ह्यात जाऊन याची माहिती घेण्याची आवश्यकता होती. पण तसे झालेले दिसत नाही. वाधवान कुटुंबीयांना परगावी जाण्याची परवानगी देणाऱ्या अमिताभ गुप्ता यांना रुजू करून घेतले आहे.

पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाणही वाढलेले असताना राज्य सरकारकडून याबाबत कोणत्याही प्रकारची  प्रभावी उपाययोजना झाल्याचे दिसत नाही. राज्य सरकार या आणीबाणीच्या काळात निर्णय घेण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. केंद्रातून मिळणाऱ्या मदतीचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचवण्यात अपयशी ठरले आहे. केंद्राने २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. महाराष्ट्रात कोरोनामुळे सर्वसामान्यांची, सर्व व्यापारी, शेतकरी, बारा बलुतेदार यांची अवस्था गंभीर बनली आहे.

अशी परिस्थिती असतानाही राज्य सरकारने  त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचे पॅकेज जाहीर केले नाही, ही खेदाची बाब आहे. कोविड योद्धे म्हणून काम करणाऱ्यांच्या हितासाठी केंद्राने पाठविलेल्या पीपीई किट्स  त्यांच्यापर्यंत पोहचल्या नाहीत. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना यामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. अकार्यक्षम सरकारला वठणीवर आणायचे असेल तर सरकारचा जाहीरपणे निषेध करायलाच हवा, अशी मागणी जोर धरत आहे.

अशा गंभीर परिस्थितीतही राज्य सरकार केवळ दिखावूपणा करत आहे, हे जनतेचे दुर्भाग्य म्हणावे लागेल, अशी टीका यावेळी करण्यात आली. या आंदोलनात आमदार सुधीर गाडगीळ, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, महापौर गीता सुतार, युवा अध्यक्ष दीपक माने सहभागी होते. पक्षाच्या निर्देशानुसार भाजपाचे सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात निषेध व्यक्त केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER