पवारांच्या आवाहनाची दखल, धाराशिव साखर कारखान्याकडून ऑक्सिजन निर्मितीला सुरूवात

उस्मानाबाद :- कोरोनाच्या (Corona Virus) दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. रुग्णसंख्या वाढत चालल्याने मागील काही दिवसांपासून राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे.या संदर्भात मागील काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यातील साखर कारखान्यांनी ऑक्सिजनची निर्मिती करावी असे आवाहन केले होते. त्याकरता त्यांनी राज्यातील सर्व सहकारी कारखाने तसेच १९० खाजगी कारखान्यांना पत्र पाठवले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्याने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारत प्रत्यक्षपणे ऑक्सिजनची निर्मिती बुधवारी सुरु केली आहे. अभिमानाची बाब म्हणजे असा प्रकल्प उभारणारा धाराशिव साखर कारखाना हा देशातील पहिलाच साखर कारखाना ठरला आहे.

धाराशिव कारखान्याने अवघ्या १७ दिवसांत हा प्रकल्प पूर्ण करून त्यातून निर्मिती सुरू केली आहे. उत्पादित झालेल्या ऑक्सिजनचे काही नमुने पनवेलच्या प्रयोगशाळेकडे तातडीने रवाना करण्यात आले आहेत. तेथून हे ऑक्सिजन वैद्यकीय वापरास उपयुक्त असल्याचा अहवाल येताच त्याचा वापर रुग्णालयांमध्ये सुरू होणार आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यानंतर ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्या अनुषंगाने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्याने पुढाकार घेत ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली.

चेअरमन अभिजित पाटील (Abhijit Patil) यांनी लागलीच ३ कोटी रुपयांची गुंतवणूक यात करून अवघ्या १७ दिवसांत प्रकल्प उभा केला. ९९.६ % इतकी ऑक्सिजनची शुद्धता या अहवालातून दिसून आली आहे. तसेच एफडीएच्या मानांकानुसार ऑक्सिजन गुणवत्ता तपासणी देखील बुधवारी पूर्ण करुन घेण्यात आली. अशी माहिती उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली आहे.

पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प चालवल्यास ६० टनापर्यंत ऑक्सिजन या कारखान्यातून निर्माण होऊ शकतो. केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील इतर कारखान्यांनाही दिशा देणारा हा प्रकल्प महाराष्ट्रातील असल्याचा आपल्या अभिमान वाटतो, असे सांगत पाटील यांनी या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवून निमंत्रण दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button