राजस्थानमध्ये भाजपकडून काँग्रेसला दणका; पाच मंत्र्यांचे बालेकिल्ले काबीज

Ashok Gehlot & BJP

जयपूर :- राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांची लोकप्रियता कमी झाल्याची बाब पंचायत समिती निवडणुकांमध्ये दिसून आली आहे. राज्यातील पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला (Congress) जबर धक्का बसला असून विरोधी पक्ष भाजपने चांगली कामगिरी केली. राजस्थानातील २१ जिल्ह्यांमध्ये झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत भाजपने काँग्रेसला जोरदार टक्कर दिली.

गेहलोत कॅबिनेटमधील पाच नेत्यांच्या जिल्ह्यातही काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला आहे. राजस्थानात एकूण ४ हजार ३७१ पंचायत समित्यांच्या निवडणुका   झाल्या. यापैकी भाजपने १ हजार ९११ जागा जिंकल्या, तर काँग्रेसला १ हजार ७८० जागा काबीज करण्यात यश आले. याशिवाय ४२५ पंचायत्यांमध्ये अपक्षांनी विजय मिळवला. आरएलपीने ५६, माकपने १६, बसपने ३, तर राष्ट्रवादीने एका पंचायत समितीवर झेंडा रोवला. दुसरीकडे, जिल्हा परिषदांच्या ६३६ जागांवर निवडणुका झाल्या. त्यापैकी भाजपने ३५३ जागा जिंकल्या, तर काँग्रेस २५२ जागा जिंकण्यात यशस्वी ठरली.

आरएलपी १०, तर १८ अपक्षांनी जिल्हा परिषदेत जागा पटकावल्या आहेत. भाजप १४ जिल्हा परिषदांमध्ये आपला अध्यक्ष बसवण्यात यशस्वी ठरली, तर केवळ पाचच जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष विराजमान झाला. दरम्यान, नागौर जिल्ह्यात हनुमान बेनीवाल यांचा पक्ष किंगमेकरच्या भूमिकेत आहे. तर डुंगरपूरमध्ये बीटीपीच्या हातात जिल्ह्याध्यक्षपद निवडण्याची ताकद आहे. पंचायत निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J P Nadda) यांनी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, डिसेंबर किंवा पुढच्या महिन्यात राजस्थानातील महामंडळे आणि अन्य पदांवर नेमणुका होणार आहेत. त्यावेळी पायलट समर्थकांना महत्त्वाच्या पदांवर वर्णी लागण्याची अपेक्षा आहे. पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाने काँग्रेसपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. ग्रामीण भागात पकड असल्याचा दावा करणाऱ्या काँग्रेससाठी हा एक झटका आहे.

ही बातमी पण वाचा : काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेणार नंतर राज्य सरकार पाडणार; केंद्रीय मंत्र्याचा दावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER