राजकारणात कोणी कोणाचा मित्र किंवा शत्रू नसतो, नेते जो आदेश देतील तो कार्यकर्ते पाळणार – गुलाबराव पाटील

Gulabrao Patil

मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदासाठी भाजप – शिवसेनेत जी ओढाताण आणि अबोला झाला तो राज्याने पाहिला आहे. त्या अबोल्यानंतर आता पुन्हा शिवसेनेचे (Shiv Sena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्याने पुन्हा भाजप-शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

यावर शिवसेनेचे प्रवक्ते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राजकारणात कोणी मित्र किंवा शत्रू नसतो, ही विचारांची लढाई असते. एखाद्याच्या लग्नसमारंभात, अंत्ययात्रेत जातो, अनेक कार्यक्रमांत जातो तसंच फडणवीस आणि राऊत भेट झाली असावी. भाजपा (BJP) आणि शिवसेना यांचा एकमेकांशी ओढा वाढला की नाही, याबाबत मी मत मांडू शकत नाही. तो ओढा तयार करण्याची जबाबदारी आमच्या वरिष्ठ नेत्यांवर आहे. नेते जो आदेश करतील तो आदेश पाळणारे आम्ही कार्यकर्ते आहोत.

तसेच कोणत्याही राजकीय नेत्यांची भेट होणे गैर नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीत राजकीय उद्देश नव्हता. ‘सामना’च्या मुलाखतीसाठी त्यांची भेट झाली, हे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. दोन्ही पक्ष वेगवेगळे असले तरी एक नेता दुसऱ्या नेत्याला भेटू शकतो. संजय राऊत हे वृत्तपत्रात प्रमुख आहेत, त्यांची काही चर्चा असू शकते; पण चर्चेला वेगळं वळण द्यावं असं नाही; एकमेकांना भेटू शकत नाहीत का? असा प्रश्नही गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला. जळगावात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला मंत्री आणि शिवसेनेचे प्रवक्ते गुलाबराव पाटील यांनी उत्तरं दिली.

दरम्यान, कालच्या राऊत – फडणवीस भेटीनंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वर्षा बंगल्यावर बैठकीसाठी बोलावले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER