नाशिक महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी स्वबळावर?, मोर्चेबांधणीला सुरूवात

Nashik Mahanagar palika

नाशिक : आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने एकला चलो चा नारा दिला आहे. त्यामुळे आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी कंबर कसली आहे. पक्ष संघटन अधिक मजबूत करा. तसेच वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होईल याची वाट न बघता प्रसंगी नाशिक महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचीदेखील तयारी ठेवा, असे आदेश छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत काल नाशिक शहरातील राष्ट्रवादी भवन मुंबई नाका येथील कार्यालयात आढावा बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते.

छगन भुजबळ म्हणाले की, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन अधिक बळकट करण्याची गरज असून संघटना त्यासाठी सर्वानी एकत्र येऊन प्रयत्न करावे. सामाजातील प्रत्येक वंचित घटकांपर्यंत पोहचूनत्यांचे प्रश्न जाणून घ्यावे. पक्षाच्या वतीने केलेली विकास कामे नागरिकांपर्यंत पोहचवावी. कुठलाही नागरिक संकटात असेल तर त्यासाठी धावून जाण्याची आपली तयारी असावी. यामध्ये युवकांची भूमिका अधिक महत्वाची असून त्यांनी यासाठी सदैव तत्पर असण्याची आवश्यकता आहे. कोरोना काळात आपण नागरिकांसाठी चांगली कामे केली आहे. ती कामे यापुढील काळातही अविरत सुरु ठेवावी. कोरोना अद्याप संपलेला नाही. त्यामुळे लोकांमध्ये जनजागृती करण्याची जबाबदारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रत्येकाची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

भुजबळ म्हणाले की, पक्षाच्या प्रचार आणि प्रसारासाठी सर्वांनी पुढे येऊन आपापल्या प्रभागात लोकहीताची कामे करावी. नागरिकांचे प्रश्न असतील ते सोडविण्यासाठी प्रयत्न करावे. आगामी निवडणुका कशा पद्धतीने लढायच्या आहेत. याबाबत पक्षातील वरिष्ठ निर्णय घेतील. तोपर्यंत आपल्याला शांत बसून चालणार नाही. प्रसंगी स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागणार आहे. त्यामुळे कोणीही गाफील न राहता, वरिष्ठ पातळीवरील निर्णयाची वाट न पाहता महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागावे, अशा सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीला माजी खासदार समीर भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER