नागपूर जिल्ह्यातील उमरेड, नागपूर ग्रामीण व मौद्यात काँग्रेसचा सभापती तर कुहीत भाजप

नागपूर : राज्यातील २६ जिल्ह्यांतील २९६ पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापतिपदांच्या निवडणुका झाल्या. काही ठिकाणी पंचायत समितीतील नवनिर्वाचित सदस्यांची संख्या समसमान असल्याने निवडणुका रंगतदार होताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुका आणि त्यानंतर सत्तानाट्याचा धुरळा खाली बसतो, तोच अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली. यापैकी नागपूर जिल्ह्यातील उमरेड, कुही, नागपूर ग्रामीण आणि मौदा पंचायत समितीचे सभापती तसेच उपसभापतीचे निकाल हाती आले आहेत .

यात उमरेड पंचायत समितीच्या सभापतिपदी काँग्रेसचे रमेश किलनाके तर उपसभापतिपदी सुरेश लेंडे अविरोध निवडून आले आहेत. त्याचप्रमाणे कुही पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपच्या अश्विनी शिवणकर, वामन श्रीरामे यांची बिनविरोध निवड झाली आहे. नागपूर ग्रामीण पंचायत सभापतिपदी काँग्रेसच्या रेखा वरठी तर उपसभापतिपदी राष्ट्रवादीचे संजय चिकटे निवडून आले आहेत. मौदा पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी काँग्रेसच्या दुर्गा राजेश ठवकर तर शिवसेनेच्या रक्षा श्रीहरी थोटे यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाली आहे.