नागपुरात राष्ट्रवादीकडून भाजपला खिंडार, मोठ्या नेत्यांसह अनेकांनी बांधले घड्याळ

Prem Zade Joins NCP - Anil Deshmukh - Jayant Patil

नागपूर :- राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) मोठ्याप्रमाणात इन्कमिंग सुरू झाले आहे. आता राष्ट्रवादीने थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याच जिल्ह्यात भाजपात (BJP) मोठे भगदाड पाडले आहे. जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन भाजपचे माजी जिल्हा महामंत्री आणि माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे (Prem Zade) यांच्यासह ५६ बुथप्रमुखांनी आज भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) व गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगणा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नेते व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

पक्षाचे ज्येष्ठ नेते रमेश बंग व विजय घोडमारे यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेशाचा सोहळा संपन्न झाला. हिंगणा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. २०२४ साली होणाऱ्या निवडणुकीत आपल्याला तिथे विजय प्राप्त करायचा आहे, यादृष्टीने पक्षबांधणी सुरू करा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षप्रवेश केलेल्या सदस्यांना केले. भाजप १५ वर्षे विरोधात असताना तुम्ही तो पक्ष जिवंत ठेवण्याचे काम केले. असे असतानाही इतर पक्षातून भाजपात आलेल्यांना तिकिटं देऊन भाजपाने निष्ठावंत नेत्यांवर अन्याय केला. इथे मात्र असे होणार नाही, अशी खात्री पाटील यांनी प्रेम झाडे व त्यांच्या सहकाऱ्यांना दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यकर्त्याला फार मान आहे. पक्षात कार्यकर्ता जपण्याचे काम होते. योग्य वेळ आल्यावर प्रत्येकाला संधी मिळेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी दिला.

याआधी तुम्ही ज्या पक्षात होतात, त्या पक्षाला मोठी ताकद देण्याचे काम केले. मात्र त्या पक्षात तुमच्यावर अन्याय झाला. याची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली असून पक्ष तुमच्या पाठीशी उभा राहील, असा विश्वास पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला. यावेळी वाडीचे माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे, अभय कुणावार, नगरसेवक हिंमत गडेकर आणि भाजपच्या बुथप्रमुखांसह हिंगणा मतदारसंघातील ५६ बुथप्रमुखांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे, सामाजिक न्याय सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे, प्रवीण मांडे, प्रा. सुरेंद्र मोरे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

ही बातमी पण वाचा : जळगावातही ‘सांगली पॅटर्न’, भाजपचे १५ नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER