मुंबईत गुरुवारी उद्धव व राज ठाकरेंचे शक्ती प्रदर्शन

मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या जयंती असून उद्याचा म्हणजे 23 जानेवारीचा हा दिवस राज्याच्या राजकारणात वादळी ठरणार आहे. या दिवसाचे औचित्य साधत मनसे आणि शिवसेनेनें मेळावे आयोजित केले आहेत. मनसेचा गोरेगावला महामेळावा होत आहे तर शिवसेनेचा ‘वचनपूर्ती जल्लोष’ सोहळाही बीकेसीत होणार आहे. या निमित्त दोन्ही ठाकरे बंधू आमने-सामने येणार आहेत.

उद्धव ठाकरे हे सरकारची भूमिका मांडतील तर राज ठाकरे हे महामेळाव्यात भाषण करतील हे निमित्त साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्षाची नवी भूमिका जाहीर करणार असून ते कुठली भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. .

मनसेचे महाधिवेशनानिमित्त मुंबईत ठिकठिकाणी मनसेकडून बॅनरबाजी केली जातेय. त्या बॅनरवर नव्या झेंड्याचे स्वरूप कसे असणार हे अजून स्पष्ट झाले नाही. मनसेचा पूर्वीचा झेंडा मात्र बॅनरवरून गायब आहे. मात्र नव्या झेंड्याचा रंग हा भगवा असणार आहे. यावरून राज ठाकरे यांची हिंदुत्वाची भूमिका अजून ठळक होत आहे.

‘सत्तेसाठी सतराशे साठ मात्र महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट’ या मजकूराचे बॅनर्स काही दिवसांपूर्वी मनसेकडून लावण्यात आले होते. एकीकडे हिंदुत्वाच्या भुमिकेकडे आगेकूच करत असताना महाराष्ट्र धर्माचा विसर पडू देणार नाही असेही मनसेला सुचवायचे आहे असे दिसून येत आहे. मनसेकडून अधिवेशनाचे दोन व्हिडीओही रिलीज करण्यात आले आहेत.

या व्हिडीओला स्वतः राज ठाकरेंनी व्हॉईस ओव्हर दिला आहे. ज्यात छत्रपती शिवाजी महाराज हे केंद्रस्थानी आहेत. छत्रपतींच्या लढाई साठी प्रत्येक जातीचा माणूस लढत होता असा आशय एका व्हिडीओमध्ये आहे तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये सगळ्या पक्षांचा आदर्श हे छत्रपती होते असा आशय आहे. एकूणच शिवसेनेची स्पेस घेण्याचा जोरदार प्रयत्न आता मनसेने सुरू केल्याचे दिसत आहे.

तर दुसरीकडे ‘शिवसेना वचनपूर्ती जल्लोष’ सोहळ्यात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा जाहीर सत्कार होणार आहे. हा सत्कार सोहळा वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या वर्षी शिवसेनेची स्थापना केली होती. त्यावेळच्या शिवसेनेच्या पहिल्या फळीतील जेष्ठ शिवसैनिकांना या सत्कार सोहळ्यात गौरव होणार आहे.

शिवसेनेने राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्ता स्थापन केल्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी स्थापन केलेली ज्वलंत हिंदुत्ववादी शिवसेना आता राहीली नसल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.