महाराष्ट्रात दोनच विठ्ठल, एक शरद पवार आणि दुसरे बाळासाहेब – संजय राऊत

Sanjay Raut-Sharad Pawar-Balasaheb Thackeray

मुंबई : मी कार्यक्रमाला येत असतांना होर्डिंग्ज बघितले, त्यावर पवार यांचा उल्लेख भीष्म पितामह असल्याचा दिसला. मला वाटतं यात काहीच गैर नाही. मी नेहमीच असे संदर्भ देत आलेलो आहे. कारण, बाळासाहेब आणि शरद पवार यांनीच चाळीतल्या पोरांना मंत्री बनवलंय. महाराष्ट्रात विठ्ठल किती, दोनच. एक म्हणजे शरद पवार आणि दुसरे बाळासाहेब हेच. असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावरील प्रेमाचा दाखला दिला.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात शरद पवारांच्या उपस्थितीत आव्हाड यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यावेळी संजय राऊत बोलत होते.

बाळासाहेब आणि शरद पवार यांनी महाराष्ट्राला नवी दिशा दिली आहे. शरद पवारांवर आव्हाड यांचं खूप प्रेम आहे. प्रेयसीपेक्षाही जास्त प्रेम पवार यांच्यावर आहे. आमचंही शरद पवारांवर खूप प्रेम आहे. कदाचित तुमच्यापेक्षाही जास्त आहे, हे पवारसाहेबांना माहिती आहे. महाविकास आघाडीची पहिली ठिणगी तेव्हा पडली, जेव्हा शरद पवार यांना ईडीची नोटीस पाठवण्यात आली. आज शरद पवार यांना नोटीस पाठवली, उद्या सामान्य कार्यकर्त्यांवर ही वेळ येईल.

बाळासाहेबांच्या एका व्यंगचित्राची आठवण करुन देताना, एक शरद अन् दोन गारद असं ते व्यंगचित्र होतं. पण, सद्यपरिस्थितीत ते व्यंगचित्र म्हणजे एक शरद अन् सगळे गारद असंच होईल, असेही राऊत यांनी म्हटले. जितेंद्र आव्हाड हा कडवा शिवसैनिक आहे. पण, हा शिवसैनिक पवारांवर प्रेम करणारा शिवसैनिक आहे, असे म्हणत बाळासाहेब आणि संजय राऊत यांचं जसं नातं होतं. तसंच, नातं शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांचं असल्याचं राऊत यांनी म्हटलं.

दरम्यान, यावेळी शरद पवारांनी जितेंद्र आव्हाड यांचं तोंडभरून कौतुक केलं. जनतेनी साथ दिल्यास कुठलंही काम अशक्य नाही. अशीच साथ गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना द्या, तुमचा हा प्रतिनिधी महाराष्ट्राचा चेहार बदलेल, अशी मला खात्री आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं.