कोल्हापुरात शिक्षकांनी पुकारला अपप्रवृत्तीविरुद्ध लढा

Teachers Protest

कोल्हापूर : कोल्हापूरच्या शिक्षण संस्थांचा संस्थाचालकांच (educational institutions of Kolhapur) वागणे बेलगाम बनले आहे. संस्थापक व संस्थाचालक पदाच्या ‘धुंदी’मध्ये ते शिक्षक वर्गासोबत मस्तवालपणे वागत आहेत. अशा संस्थाचालकामुळे शिक्षक हतबल बनले आहेत, शिवाय शिक्षण क्षेत्रालाही बट्टा लागत आहे. अशा मस्तवाल संस्थाचालकांना शिक्षण विभाग व लोकप्रतिनिधींनी वेसण घालणे अत्यावश्यक बनले आहे.

काही संस्थाचालक ‘मी शाळेचा मालक आणि शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी माझे गुलाम’अशा विचित्र मानसिकतेने वागत आहेत. शिक्षण क्षेत्र, शिक्षकांचे महत्व यासंबंधीचे कसलेही भान काही काही संस्थाचालकांना उरले नाही. रुईकर कॉलनी येथील खासगी शाळेत मुख्याध्यापकासोबत घडलेल्या प्रकारामुळे ठिकठिकाणच्या बेलगाम संस्थाचालकाच्या कारनाम्याची चर्चा शिक्षकवर्गात रंगली आहे.

लॉकडाऊनमध्ये शिक्षकाला लावले कटिंग करायला

डीएड, बीएड आणि पदव्युत्तर शिक्षण चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन अनेक तरुण, तरुणींनी शिक्षक पेशा अंगिकारला. शिक्षकाची नोकरी म्हणजे समाजात मान, विद्यार्थ्यांमध्ये आदराची भावना. बहुतांश संस्थेत शिक्षकांचा मान-सन्मान राखला जातो. मात्र काही संस्थाचालक मात्र शिक्षकांना वेठबिगारीवरील मजुरासारखी वागणूक देतात. लॉकडाऊनच्या कालावधीत एका संस्थाचालकाने एका शिक्षकाला कटिंग करायला लावले. नोकरीच्या भितीपोटी त्या शिक्षकाने नाइलास्वत त्या संस्थाचालकाचे केस कापले. नोकरीच्या भितीपोटी शिक्षकांपुढे अन्य पर्यायही नव्हता.

आई-वडिलांचे कष्ट आणि प्रोत्साहनाच्या बळावर मुली आज शिकत आहेत. नोकरी करत आहेत. शिक्षकी पेशामध्ये महिलांची संख्या मोठी आहे. विवाहानंतरही अनेक महिला माहेरचे आडनाव लावतात. त्यामागे आई-वडिलांच्या कष्टाचा धागा जुळलेला असतो. माहेरच्या नात्याची वीण असते. मात्र एका संस्थाचालकाने, महिला शिक्षकांना माहेरचे आडनाव लावण्यावरुन असभ्य भाषा वापरली. लग्नानंतर त्या महिला शिक्षकांनी प्रसुतीसाठी रजा मागितल्यावर तुम्ही कुमारी माता बनलात अशी न शोभणारी शेरेबाजी करुन एका संस्थाचालकाने त्यांचा अपमान केला.

लॉकडाऊनच्या कालावधीत शाळा बंद होत्या. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू केले. पण एका संस्थाचालकाने शिक्षकांना शिपायासारखी कामे लावली. शाळा बंद आहेत तर रोज येऊन वर्गात थांबायचे, संस्थाचालकाच्या घरी भाजी आणून द्यायची अशा प्रकारची कामे करवून घेतली. दिवाळी सणात तर शिक्षिकांना संस्थाचालकाने फराळ तयार करायला सांगितले. हा सारा प्रकार असह्य, मात्र नोकरीसाठी शिक्षक, शिक्षिका यांनी निमूटपणे ते सहन केले.

संस्था, शाळेच्या नावावर नोकरीची भिती घालून शिक्षकांना गुलामासारखा वागवणारे संस्थाचालक शहरापासून तालुकापातळीपर्यंत बिनधिक्कतपणे वावरत आहेत. कधी लोकप्रतिनिधींशी नातेसंबंध सांगत तर कधी बड्या अधिकाऱ्यासोबतच्या ओळखीचा गैरफायदा घेत शिक्षकांना त्रास देत आहेत. शहरातील खासगी शाळेत मुख्याध्यापकासोबत घडलेल्या प्रकारानंतर शिक्षक एकवटत आहेत. मुजोरपणे वागणाऱ्या संस्थाचालकाला विरोध करत आहेत. शिक्षक संघटना त्यांच्या पाठीशी उभ्या राहत आहेत. अशा वेळी शिक्षण विभाग व समाजाचे नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी भूमिका घेण्याची गरज आहे. एक-दोघा बेलगाम संस्थाचालकांच्या गैरवर्तणुकीने शिक्षण क्षेत्राचे नाव खराब होणार नाही हे पाहणे सार्वजनिक जबाबदारी आहे. तेव्हा शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या जाणत्या मंडळीवर अधिक जबाबदारी आहे. त्यांनी ‘पालक’त्वाच्या भूमिकेतून शिक्षण क्षेत्राला काळीमा फासण्याचे काम करणाऱ्या प्रवृत्तीला धडा शिकवण्यासाठी कारवाईची छडी उगारावी लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER