कोल्हापुरात गव्यांचा गावात वावर वाढला

गवा

कोल्हापूर : जिल्ह्यातील आजऱ्यासह कागल, राधानगरी, भुदरगड तालुक्यात गव्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. गव्यांच्या खाण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. अधिवासामध्ये मानवी हस्तक्षेप झाल्याने त्यांचा लाजाळू स्वभाव धीट होत आहे.

युरियायुक्त खाद्यपदार्थ मिळाल्याने वारंवार गवे पिकामध्ये येतात. कीटकनाशकामुळे गवा पिकामध्ये आला की गंधग्रंथी कमजोर होतात. त्यामुळे गवे नैसर्गिक वाटा चुकून भटकतात. असे भटकलेले गवे विष्ठा आणि मूत्रगंधावर पुन्हा कळपामध्ये येतात. वणवे आणि शिकारीमुळे शाकाहारी प्राणी संपत चालले आहेत. त्यांच्यावर जगणारे मांसभक्षक प्राणी अधिवास सोडून गेल्याने गव्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणारे वाघ-बिबटे कमी झाल्याने गव्याची संख्या वाढली.

लोक जसजसे जंगलात शिरकाव करू लागले आहेत, तसतसे वन्य प्राणी गावे आणि शहराच्या दिशेने येऊ लागल्याचे दिसत आहे. रात्रीबरोबरच आता दिवसाही गव्यांच्या कळपाचे कोल्हापूरातील (Kolhapur) गावांतून दर्शन घडू लागले आहे. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांसह प्रवाशांच्या आडवे हे गव्यांचे कळप अचानक येत असल्याने भीती निर्माण झाली आहे. याशिवाय रात्रीच्यावेळी शेतीमध्ये घुसून पिकांची प्रचंड नासाडी गव्यांच्या कळपाकडून सुरू आहे.

काल, रविवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास पेरणोली-वझरे रस्त्यावर वाहनधारकांना गव्यांच्या कळपाचे दर्शन झाले. लहान-मोठे आठ ते दहा गवे या कळपामध्ये असल्याचे वाहनधारकांनी सांगितले. पेरणोली, साळगाव, सोहाळे, वझरे, कोरीवडे, हरपवडे, देवकांडगाव आदी परिसरातील उसासह अन्य पिकांची गव्यांकडून नासाडीही सुरू आहे. दिवसाही आता गव्यांचे कळप गावालगतच दिसून येत आहेत. त्यामुळे शेतीची कामे करण्याकरिता जाण्यासही भीती निर्माण झाली आहे.

गव्यांसाठी राखीव असणारे हे अभयारण्य पश्चिम घाटामध्ये सह्याद्री पर्वतरांगांच्या दक्षिण टोकाला आहे. राधानगरी अभयारण्य रानगव्यांसाठी प्रसिद्ध असून हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले अभयारण्य आहे. याची स्थापना 1958 साली करण्यात आली आणि त्यावेळी याला दाजीपूर अभयारण्य असे नाव देण्यात आले.

विकासाच्या नावाखाली वन्यजीव विभाग मोठमोठ्या यंत्राचा वापर करत असल्याने प्राणी बिथरत आहेत. मुळातच राखीव जंगलामध्ये यंत्रसामग्री वापरण्यास बंदी असताना या ठिकाणी का वापरली जाते, हा संशोधनाचा विषय आहे. अधूनमधून होणाऱ्या शिकारी आणि त्याकडे होणारे दुर्लक्ष हेही गव्यांच्या असुरक्षिततेचे प्रमुख कारण असू शकते. पर्यटनाच्या नावाखाली अनावश्यक ठिकाणी उभारलेले टॉवर आणि तिथे वाढलेली वर्दळ प्राण्यांना त्रासदायक ठरत आहे. कारवीचे वाढलेले प्रचंड साम-ज्य यामुळे गवती कुरणे नष्ट झाली आहेत. त्यामुळेच गवे नागरी वस्तीत येत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER