कोल्हापूरात ४७ बिनविरोध तर ३८६ ग्रामपंचायतींत धूमशान

Gram Panchayat Elections

कोल्हापूर : जिल्ह्यातील ४३३ पैकी ४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Gram Panchayat Elections) बिनविरोध झाल्या आहेत. अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर जिल्ह्यातील चित्र स्पष्ट झाले. अनेक ठिकाणी दुरंगी, तिरंगी आणि चौरंगी लढती होत आहेत. जिल्ह्यातील ३८६ ग्रामपंचायतींत ७,६५७उमेदवार रिंगणात आहेत. या ग्रा.पं. साठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे.

जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी चुरशीने १५ हजार ८३० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत १८७ अर्ज अवैध ठरले. आज माघारीच्या दिवशी सुमारे साडेसहा हजारांवर उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. जिल्ह्यातील ४७ ग्रामपंचायतीत जितक्या जागा आहेत, तितकेच अर्ज शिल्लक राहिल्याने या ग्रामपंचायती बिनविरोध म्हणून घोषित करण्यात आल्या. शाहूवाडी आणि चंदगडमध्ये सर्वाधिक प्रत्येकी आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.कागल आणि गडहिंग्लजमध्ये प्रत्येकी सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. आजरा तालुक्यात ५, भुदरगड आणि करवीर तालुक्यांत प्रत्येकी ४, पन्हाळ्यात तीन, राधानगरीत दोन, तर हातकणंगलेत एक अशा ४७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. गगनबावडा आणि शिरोळ तालुक्यात मात्र, एकही ग्रामपंचायत बिनविरोध झाली नाही. जिल्ह्यात ४७ग्रामपंचायतींसह सुमारे २०० हून अधिक जागाही बिनविरोध झाल्या आहेत. आज माघारीच्या दिवशी एकूण ७ हजार ४० उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात ७ हजार ६५७ जण रहिले आहेत. अर्ज माघारीची प्रक्रिया संपल्यानंतर बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांनी गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला. निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्हवाटप करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER