अवघ्या सात दिवसात मुंबईतील वाहनांसाठीचा ‘कलर कोड’चा निर्णय मागे

Maharashtra Today

मुंबई :- राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सात दिवसांपूर्वी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करत कलर कोड सक्तीची घोषणा केली होती. मुंबईत प्रवास करण्यासाठी अत्यावश्यक सेवा आणि महत्वाच्या कामासाठी बाहेर पडणाऱ्यांना वाहनाला एक खास रंगांचे स्टिकर लावण्याचं आवाहन हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांनी केलं होतं. यासाठी मुंबई पोलिसांनी खास ३ रंगाचे स्टिकर सिस्टम सुरु केली होती. मात्र अवघ्या सात दिवसात मुंबईतील ही कलरकोड स्टिकर सिस्टीम बंद करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. “प्रिय मुंबईकरांनो, लाल, पिवळा, हिरवा रंग #EmergencyStickers वर्गीकरण बंद केले जात आहे. तथापि, संपूर्ण तपासणी चालू ठेवली जाईल आणि आम्ही आशा करतो की, आपण #TakingOnCorona मध्ये आमच्या पाठीशी उभे राहाल आणि घराबाहेरची सर्व अनावश्यक / विना-आपत्कालीन हालचाल टाळाल. #StayHomeStaySafe” असं ट्विट केलं आहे.

राज्यात कोरोनाची (Corona) साखळी खंडित करण्यासाठी संचारबंदी आणि कडक निर्बंध लावण्यात आले होते. मात्र संचारबंदी काळातही मुंबईतील रस्त्यांवर काही वाहनांचा मुक्तसंचार सुरू असल्याने तसेच वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असल्याने हा कठोर निर्णय घेण्यात आला होता. यानुसार अत्यावश्यक सेवेतील खासगी वाहनांसाठी तीन कलर कोड निश्चित केले होते. मात्र नागरिकांमध्ये याबाबत संभ्रम पाहायला मिळत होता. कोणत्या रंगाचा स्टिकर वाहनाला लावायचा याबाबत अनेकजण गोंधळले होते. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबई पोलिसांना याबाबत अनेक सवालही विचारण्यात आले होते. त्यामुळे मुंबई पोलिसांनी तयार केलेली ही पद्धत अवघ्या सात दिवसात त्यांच्यासाठी डोकेदुखी झाली होती. त्यामुळे पोलिसांनी हा कलर कोडचा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे आता मुंबईतील वाहनांना लाल, पिवळा, हिरव्या रंगाचे स्टिकर लावणे बंधनकारक असणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button