गृहमंत्र्यांच्या नागपुरात एकाच दिवसात 3 खून

नागपूर : राज्याचे गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांनी नुकताच कार्यभार हाती घेतला असून कार्यभार स्विकारून काही दिवस लोटले नाही तो नागपूर शहरात गेल्या 24 तासांत खूनाच्या तीन घटना घडल्याने संपूर्ण शहर हादरले आहे. यामुळे गृहमंत्र्यांसमोर एक नवे आव्हान निर्माण झाले आहे. एका दिवसांत तिघांची हत्या झाल्याने पुन्हा गुन्हेगारी जगत डोके वर काढू लागले काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पहिली घटना नागपुर जिल्ह्याच्या कन्हान येथे घडली. जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार असलेल्या उमेदवाराच्या नातेवाईकाची चाकू ने भोसकून हत्या करण्यात आलीय. संजू खडसे असे मृतक तरुणाचं नाव आहे. संजू आणि आरोपी एका बार मध्ये मद्यपान करत असताना बाजूच्या टेबल वर बसलेल्या तिघांशी त्यांचा वाद झाला होता. त्यातूनच संजूची हत्या करण्यात आली. संजूची हत्या राजकीय वादातून झालेली नाही हे पोलिसांनी आधीच स्पष्ट केले आहे.

दुस-या घटनेत नागपुर शहराच्या यशोधरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राणी दुर्गावती चौकातील एक सावजी हॉटेल मध्ये घडली आहे. मंगळवारी रात्री समीर हा वनदेवीनगर भागात एकटा असल्याची माहिती मिळताच मारेकरी त्याचा पाठलाग करायला लागले. बचावासाठी समीर आर. के. सावजी भोजनालयात घुसला. प्रवीणचे साथीदारही त्याच्या मागोमाग भोजनालयात घुसले. चाकूने सपासप वार करून समीरची हत्या केली.

तिसरी घटना वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. हिमांशू ढेंगे नावाच्या तरुणाची दगडाने ठेचून अज्ञात आरोपींनी हत्या केली. हिमांशूची ओळख पटू नये यासाठी आरोपींने त्याच्या तोंडावर दगड टाकून त्याचा चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी मृतकाची ओळख हिमांशू म्हणून झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.