गोव्यात पर्यटकांना बंदी, १४४ कलम लागू

In Goa ban on tourists, section 144 invoke

पणजी :- गोव्यात कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी गर्दी होऊ नये यासाठी राज्यात १४४ कलम लागू करण्यात आले असून  दुस-या राज्यातून येणा-या पर्यटकांना येथे गोव्यात प्रवेश दिला जाणार नाही. त्याची अंमलबजावणी आज मध्यरात्रीपासून केली जाणार आहे. तथापि, जीवनावश्यक वस्तूंच्या आंतरराज्यीय वाहतुकीवर कोणतीही बंदी नसल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आज स्पष्ट केले.

राणे म्हणाले, राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक पावले उचलण्यात आली असून राज्यात जमावबंदी आदेश म्हणजेच १४४ कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे येथे पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. आता कोणताही कार्यक्रम, सोहळा, उत्सव करता येणार नाही.

जे गोमंतकीय अत्यावश्यक कामासाठी गोव्याबाहेर ये-जा करणार आहेत त्यांचीदेखील तपासणी केली जाणार आहे. लोकांनी अत्यंत महत्त्वाचे काम असल्याशिवाय कुठेच फिरू नये. सगळ्याची साथ मिळाली तर आपण आपले राज्य सुरक्षित राखू यात शंका नाही, असेही ते म्हणाले.