….हो साथ न देण्यात , आम्ही चुकलोच !

bjp-ncp-congress-shivsena

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विदर्भाचा मुंबई मंत्रालयात प्रचंड दबदबा होता. फडणवीस यांच्या निमित्ताने गृह आणि नगरविकास व सामान्य प्रशासन ही महत्त्वाची खाती विदर्भाच्या हातात होती. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले हेही नागपूर विभागातीलच होते.

अधिकाऱ्यांपासून मंत्रालयातील पत्रकारही म्हणायचे की पहिल्यांदाच विदर्भाचे राज्य मंत्रालयात असल्याचे जाणवते. निधीपासून योजनांपर्यंत विदर्भाला प्राधान्यक्रम मिळायचा. नवीन कोणतीही योजना निघाली की त्यात विदर्भाचे किती जिल्हे घेतलेत हे आवर्जून पाहिले जायचे. स्वत: मुख्यमंत्री दरवेळी विदर्भाला अधिकाधिक न्याय कसा मिळेल याची काळजी घ्यायचे.

उद्धव ठाकरे यांच्याकडून ती अपेक्षा कशी करणार? महाविकास आघाडी सरकार आल्यापासून विदर्भाची रयाच गेली आहे. खातीही काय मिळाली? वित्त, नगरविकास, महसूल,सामाजिक न्याय, आदिवासी विकास, ग्रामविकास यापैकी कोणतेही खाते विदर्भाकडे नाही. म्हणायला गृहमंत्रीपद अनिल देशमुखांकडे आहे पण त्यांना मुंबईच्या इशाऱ्यावरच चालावे लागते. त्यांनी घेतलेल्या निर्णयांवर त्यांची नाही तर ‘सिल्व्हर ओक’ची छाप असते असे आतापासूनच बोलले जात आहे.

मध्यंतरी जिल्हा नियोजन समित्यांना निधीचे वाटप करण्यात आले. विदर्भातील एकाही जिल्ह्याची समिती अशी नव्हती की जिचा निधी गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी करण्यात आला नाही. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी २४ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या वित्त मंत्री अजित पवार यांनी मांडल्या. त्यातही बारामतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला. बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयालादेखील कोट्यवधी रुपये आधीच देण्यात आले. या सरकारचे एकेक निर्णय बारकाईने बघितले तर विदर्भावरील अन्याय यापुढील काळात वाढत असल्याचे नक्कीच दिसेल आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला साथ न देण्यात आपण चूकच केली याची जाणीव विदर्भवासियांना झाल्याशिवाय राहणार नाही.

ज्या विदर्भाच्या भरवश्यावर २०१४ मध्ये भाजपची सत्ता आली त्याच विदर्भाने भाजपला गेल्यावेळी धोका दिला.

शिवसेनेचे मुंबईप्रेम सर्वविदित आहे. त्यातच सत्ता मातोश्रीची आहे आणि युवानेते आदित्य ठाकरे यांना मुंबईत सुविधांचे जाळे उभारण्यात प्रचंड इंटरेस्ट आहे. राष्ट्रवादीचे पश्चिम महाराष्ट्र प्रेम कधीही लपून राहिलेले नाही. चेष्टेने या पक्षाला पश्चिममहाराष्ट्रवादी असेही म्हटले जाते. काँग्रेसमध्ये नितीन राऊत, विजय वडेट्टीवार असे काही नेते आहेत की ज्यांना विदर्भाविषयी कणव आहे पण त्यांच्या खात्यांना मर्यादा आहेत. तसेच, आपले शहर वा जिल्ह्यापलिकडे नेतृत्व करायला ते गेले रे गेले की त्यांचे पंख छाटणे सुरू होते. काँग्रेसमध्ये एका मर्यादेपलिकडे कोणालाही मोठे होऊ दिले जात नाही.

वडेट्टीवार यांनी सत्तांतराच्या काळात खूप पुढाकार घेतला पण नंतर त्यांना अत्यंत कमी महत्त्वाचे खाते दिले गेले.

तेव्हापासून ते आपला विधानसभा मतदारसंघ, जास्तीत जास्त चंद्रपूर जिल्हा बरा आणि आपण बरे या मानसिकतेत आहेत. महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर तिसऱ्यांदा आमदार असल्या तरी मंत्री म्हणून नवीन आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत वा सरकारमध्ये विदर्भाचा दबंग आवाज आज दिसत नाही. फडणवीस सरकारला पुन्हा संधी दिली असती तर विदर्भाबाबत असे निराशाजनक चित्र दिसले नसते; एवढेच.