धुळ्यात पुन्हा एकदा काँग्रेसच्या गटबाजीचा फायदा भाजपलाच

Dhule Vidhan Sabha

मोठे उद्योग नाहीत गुन्हेगारीचे प्रमाण अधिक मागासलेपणाचा शाप आजही कायम अशा अवस्थेत असलेल्या धुळे जिल्ह्याचे राजकारण विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तापण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभेचे 5 मतदारसंघ असलेल्या या जिल्ह्यात भाजपचाच बोलबाला आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या जोरदार यशामुळे भाजपच्या तंबूत उत्साहाचे वातावरण आहे. त्याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत  कलहाने त्रस्त आहे. अंतर्गत समन्वय चांगले राहिले तर भाजपला दमदार यश मिळू शकते.

ही बातमी पण वाचा : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात फुलताहेत कमळं

धुळे शहर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे अनिल गोटे यांनी केव्हाच भाजपला रामराम ठोकला आहे. मात्र महापालिका निवडणुकीत त्यांचे वर्चस्व धुळीला मिळवीत भाजपने त्यांना जोरदार धक्का दिला होता धुळ्याचे विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी गोटे यांचे अस्तित्व जवळपास  संपविले.  गोटे यावेळी  अपक्ष लढतील अशी शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात शाळा डिजिटल करणारे हर्षल विभांडिक, भाजपचे महानगरप्रमुख अनुप अग्रवाल तसेच माजी मंत्री शालिनीताई बोरसे यांच्या कन्या डॉ. माधुरी बाफना ही तीन नावे  भाजप उमेदवारीच्या चर्चेत आहेत. अग्रवाल हे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्ती आहेत. महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यात अग्रवाल यांची महत्त्वाची भूमिका होती. त्याच वेळी संघाच्या कॅडरने हर्षल यांची पाठराखण केली असल्याचे दिसते. उमेदवार निश्चित करण्यात भाजपची कसोटी लागणार आहे.काँग्रेसतर्फे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे जावई किशोर पाटील यांचे नाव चर्चेत आहे. ते मोठे कंत्राटदार आहेत. महापालिकेतील विरोधी पक्षनेते साबीर शेख हेही स्पर्धेत आहेत. मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला तर माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांना संधी मिळू शकते. त्याचवेळी राष्ट्रवादीतर्फे इरशाद जागीरदार हा नवा चेहरा समोर आला आहे. ही जागा युतीमध्ये भाजपकडेच राहणार हे जवळपास स्पष्ट आहे तरीही शिवसेनेतर्फे माजी आमदार शरद पाटील, सतीश महाले इच्छुक आहेत.

ही बातमी पण वाचा : पुण्यात जागावाटपावरून आघाडीत तेढ; अजित पवारांचा प्रस्ताव कॉंग्रेसला अमान्य

धुळे ग्रामीण मतदारसंघात विद्यमान आमदार काँग्रेसचे कुणाल पाटील यांनाच काँग्रेस पुन्हा संधी देईल असे दिसते. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राम  भदाणे भाजपतर्फे सशक्त दावेदार आहेत. याशिवाय रामकृष्ण खलाणे, कुणाल पाटील यांचे मामा सुभाष देवरे, नगर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  माजी मंत्री  दिवंगत  बी. जी.  खताळ  यांचे नातू  उत्कर्ष पाटील यांनीही भाजपची उमेदवारी मागितली आहे.

शिंदखेडा मतदारसंघात पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचे वर्चस्व आहे. त्यांना पुन्हा एकदा भाजपा उमेदवारी देणार हे निश्चित आहे. गेल्यावेळी त्यांच्याविरोधात लढलेले राष्ट्रवादीचे संदीप बेडसे याहीवेळी तयारीत आहेत. त्याच वेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि उद्योजक ज्ञानेश्वर भामरे हेही राष्ट्रवादीतर्फे इच्छुक आहेत. ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली शाम सणेर हे दावेदार असतील. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या शिरपूर मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार काशीराम पावरा पुन्हा इच्छुक आहेत. त्यांचे राजकीय गुरू माजी मंत्री अमरीशभाई पटेल काय भूमिका घेतात हे सर्वात महत्त्वाचे असेल. अमरीश पटेल हे भाजपमध्ये जाणार अशी जोरदार चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. मात्र ते काँग्रेसमध्येच राहतील असे विश्वसनीय सूत्रांकडून समजले.

लोकसभा निवडणुकीत शिरपूर मतदारसंघात भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांना एक लाख मतांची आघाडी होती. शिरपूर हा पटेल यांचा बालेकिल्ला आहे.  माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचे पुत्र आमदार कुणाल पाटील हे काँग्रेसतर्फे लोकसभेच्या रिंगणात होते. रोहिदास पाटील आणि अमरीश पटेल यांच्यात काँग्रेस अंतर्गत गटबाजी आहे. त्या गटबाजीचा फटका कुणाल पाटील यांना लोकसभेमध्ये बसला होता. यावेळी अमरिश पटेल कोणती भूमिका घेतात हे शिरपूर आणि साखरी या दोन मतदारसंघांत करतात महत्त्वाचे ठरणार आहे.

साक्री मतदारसंघात काँग्रेसचे डी.एस. अहिरे हे विद्यमान आमदार आहेत.त्याठिकाणी धुळ्याच्या माजी महापौर मंजुळा गावित, शासकीय अधिकारीपदाचा राजीनामा देऊन राजकारणात येत असलेले मोहन सूर्यवंशी हे भाजप उमेदवारीचे प्रमुख दावेदार आहेत.

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या धुळे जिल्ह्यात हळुहळु पक्षांतर्गत गटबाजीचे आणि पाडापाडीच्या राजकारणाचे चटके काँग्रेसला बसले आणि पक्षाचे मोठे नुकसान झाले. इतके नुकसान होऊनदेखील काँग्रेसचे नेते पूर्वीच्याच मस्तीत वावरतात. इतिहासात केलेल्या चुकांची उजळणी सुरूच आहे. विधानसभा निवडणुकीतही त्याचीच पुनरावृत्ती झालेली दिसेल. त्याचा मोठा फायदा भाजपला होईल.