डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे येत्या दोन वर्षांत देखणे, दिमाखदार स्मारक : मंत्रिमंडळाचा निर्णय-अजित पवार

Ajit Pawar-Ambedkar Memorial

मुंबई : दादर येथील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणा-या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या कामाला गती देण्याचा महत्वाचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून येत्या दोन वर्षांत देखणे, दिमाखदार आणि अभिमान वाटावा असे स्मारक उभारणार असल्याची ग्वाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

इंदू मिलच्या जागेवरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पुतळ्याची उंची वाढवण्याच्या सुधारित प्रस्तावाला बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. आता डॉ आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची शंभर फूटांनी वाढविण्यात येत असून ती आता अडीचशे ऐवजी 350 फूट असेल.

बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम रेंगाळल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्याकडे लक्ष वेधले होते. यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले, धनंजय मुंडे आणि इतर काही नेत्यांनी स्मारकाच्या जागेची पाहणी करून हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकी घेण्याचा आग्रह धरला होता. त्याप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विषय बैठकीत घेतला. त्यात स्मारकाची उंची वाढवण्यासह इतर निर्णयांना मंजूरी देण्यात आली. दोन वर्षात स्मारक पूर्ण करणार असून मी स्वतः अर्थमंत्री असल्याने निधी कमी पडू देणार नाही.

पवार म्हणाले, हे स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे असेल. या स्मारकात संशोधनासह ग्रंथालय आणि इतर बऱ्याच सुविधा असणार आहेत. कोणत्याही परवानग्या केंद्राकडून मंजूरीसाठी राहिलेल्या नाही. मात्र राज्य सरकारकडे राहिलेल्या सर्व परवानग्या आठ दिवसात पूर्ण करण्यात येतील. आजच्या बैठकीला एमएमआरडीएमचे अधिकारी उपस्थित होते.