भीमा कोरेगाव प्रकरण : शरद पवारांच्या चौकशीबद्दल गृहमंत्र्यांची भूमिका ‘नरो वा कुंजरो वा’

Sharad Pawar And Anil Deshmukh

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी चौकशीसाठी बोलावले आहे किंवा नाही याबद्दल माहिती नसल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. शदर पवारांना चौकशी आयोगासमोर बोलावण्यात येणार आहे का? असा प्रश्न विधान परिषदेतील आमदार विनायक मेटे यांनी विचारला त्यावेळी गृहमंत्री देशमुख यानी ‘नरो वा कुंजरो वा’ भूमिका घेतली. राज्य सरकार या प्रकरणावर कानावर हात ठेवत असताना आमदार विनायक मेटे यांनी आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी मात्र शरद पवार यांना चौकशी आयोगापुढे हजर राहण्यासाठी समन्स बजावले जाईल, असे म्हटल्याची माहिती दिली. कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी माजी न्यायमूर्ती जे.एन.पटेल यांचा चौकशी आयोग नेमण्यात आला आहे.

दिल्ली हिंसाचारादरम्यान आप नगरसेवकाच्या घरात सापडल्या बंदुका, पेट्रोल बॉम्ब आणि दगडांचा ढीग

या आयोगाला महाविकास आघाडी सरकारनं अहवाल सादर करण्यासाठी ८ एप्रिलपर्यंतची शेवटची मुदतवाढ दिली आहे. या प्रकरणी विवेक मंच या सामाजिक संस्थेचे सदस्य सागर शिंदे यांनी शरद पवार यांची या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी करणारा अर्ज आयोगासमोर सादर केला होता. त्यासाठी २०१८ साली पवार यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यांचा आधार घेतला होता. त्यामुळे पवार यांना या प्रकरणाच्या सुनावणीच्या शेवटच्या टप्प्यात चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.

या पत्रकार परिषदेत पवार यांनी “उजव्या विचारांचे कार्यकर्ते मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी कोरेगाव भीमा परिसरात वेगळे वातावरण तयार केले” असा आरोप केल्याचे शिंदे यांनी आपल्या अर्जात म्हटले होते. त्यासोबत पवार यांनी “पुणे पोलीस आयुक्तांची भूमिका संशयास्पद” असल्याचे शिंदे यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे. त्यामुळे पवार यांची चौकशी आवश्यक असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे.