अयोध्याप्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालय सुनावणार ऐतिहासिक निर्णय

Supreme-Court

नवी दिल्ली :- सर्वोच्च न्यायालय उद्या (दि.९ नोव्हेंबर) सकाळी १०.३० वाजता देशातील सर्वांत  जुना खटला असलेल्या अयोध्याप्रकरणावर निकाल सुनावणार आहे. यापूर्वी १६ ऑक्टोबर रोजी या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. या निकालाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

१३४ वर्षांचा हा जुना खटला असून त्यावर येणारा उद्याचा अंतिम निकाल हा ऐतिहासिक  असणार आहे. दरम्यान, १७ नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश रंजन गोगोई हे निवृत्त होत असल्याने तत्पूर्वी हा निकाल येणे निश्चित होते. त्यानुसार, आता उद्या यावर अंतिम निकाल येणार आहे. उद्या सकाळी १०.३०  वाजता सुप्रीम कोर्ट हा निकाल देणार आहे. ५ ऑगस्टपासून दररोज या प्रकरणी सुनावणी सुरू होती. ही सुनावणी १६ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण झाली.

ही बातमी पण वाचा : अयोध्या निकालासंदर्भात प्रशासन सतर्क

सरन्यायाधीश गोगोई यांच्या निवृत्तीसाठी केवळ चारच कामकाजाचे दिवस शिल्लक राहिले असल्याने उद्याचाच दिवस हा निकालाचा दिवस निवडला गेला असावा, असे राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे. कालच सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी त्यांच्याकडील सर्व महत्त्वाच्या  तत्काळ सुनावणीचे खटले नियोजित सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्याकडे सोपवले होते. त्यावरूनच लवकरच अयोध्येवर निकाल येऊ शकतो याची चर्चा सुरू होती.

निकालानंतर सामाजिक सलोखा आणि एकात्मता कशी टिकवून ठेवता येईल यावर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या निवासस्थानी भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या नेत्यांनी मुस्लिम धर्मगुरू, विचारवंत आणि अभ्यासकांची नुकतीच भेट घेतली.

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत आरएसएसकडून कृष्ण गोपाळ, रामलाल आणि माजी मंत्री शहानवाज हुसेन तसेच मुस्लिम समाजातील नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या. कुठल्याही परिस्थितीत सामाजिक सलोखा, बंधुत्व, एकात्मता अधिक बळकट करण्याचा निर्धार या बैठकीला उपस्थित असलेल्या सर्वांनी व्यक्त केला होता. सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निर्णय असेल त्याचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे. शांतता राखण्याचे आम्ही सर्वांना आवाहन करू, असे शिया धर्मगुरू  मौलाना सय्यद कालबी जावाद माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.