बॉलिवुडमध्ये पुन्हा खेळाडूंच्या जीवनावरील सिनेमांची मांदियाळी

Maidaan - Shabaash Mithu

गँगस्टर आणि राजकारण्यांसोबतच खेळ आणि खेळाडूही बॉलिवुड निर्मात्यांचा आवडीचा विषय आहे. त्यामुळेच यापूर्वी खेळ आणि खेळाडूंवर अनेक सिनेमे बनले आहेत. अनेक खेळाडूंनीही सिनेमात काम केलेले आहे. खेळावर आधारित अनेक सिनेमे आले असले तरी त्यापैकी मोजकेच सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत. यात आमिर खानचा लगान वरच्या क्रमांकावर आहे. आमिर खानने या सिनेमात ब्रिटिश कालीन कथा घेऊन त्यात क्रिकेटचा थरारक रोमांच दाखवला होता. आशुतोष गोवारीकरने अत्यंत उत्कृष्टपणे या सिनेमाची हाताळणी केली होती. प्रेक्षकांना हा सिनेमा खूपच भावला होता. एवढेच नव्हे तर भारताकडून ऑस्करसाठीही याची निवड करण्यात आली होती. लगान ऑस्करच्या शर्यतीत मागे पडला ही वेगळी गोष्ट. आमिर खानच्याच जो जीता वह सिकंदरमध्ये तर सायकलिंगच्या शर्यतीचा थरार दाखवण्यात आला होता. हा सिनेमाही तिकीट खिडकीवर सुपरहिट झाला होता. त्यानंतर क्रिकेट, कुस्ती, फुटबॉल, हॉकी या खेळांवरही अनेक सिनेमे आले. यापैकी दंगल, सुलतान, चक दे इंडिया, पटियाला हाऊस, पान सिंह तोमर, धन धना धन गोल, इकबाल, मेरी कोम, हवा हवाई, साला खडूस, जन्नत, भाग मिल्खा भाग, एमएस धोनी असे सिनेमे आले आणि प्रेक्षकांनी या सिनेमांना बऱ्यापैकी आश्रयही दिला होता. सचिन तेंडूलकरच्या जीवनावरील डॉक्यूड्रामाही प्रदर्शित करण्यात आला होता.

यानंतर आता पुन्हा एकदा बॉलिवुडमध्ये खेळावर आधारित सिनेमांची रांग लागणार आहे. पुढील वर्षी खेळावर आधारित अनेक सिनेमे प्रदर्शित होणार असून यापैकी पहिला प्रदर्शित होणारा सिनेमा आहे 83. कपिल देवच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट टीमने 1983 मध्ये पहिल्यांदा वेस्ट इंडिजला हरवून वर्ल्ड कप जिंकला होता. भारताचा हा विजय आजच्या पिढीला माहित व्हावा म्हणून 83 ची निर्मिती करण्यात आली आहे. रणवीर सिंह यात कपिल देवची भूमिका साकारीत असून दीपिका पदुकोन कपिल देवच्या पत्नीची भूमिका साकारीत आहे. विशेष म्हणजे दीपिका सिनेमाची सहनिर्मातीही आहे. हा सिनेमा खरे तर याच वर्षी प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोनामुळे तो प्रदर्शित होऊ शकला नव्हता. आता पुढील वर्षी हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे.

भारतीय फुटबॉलमधील प्रख्यात कोच सय्यद अब्दुल रहीम यांच्याही जीवनावर मैदान नावाने सिनेमा तयार झाला असून तोसुद्धा पुढील वर्षी दसऱ्याला प्रदर्शित केला जाणार आहे. सय्यद रहीम यांना भारतातील आधुनिक फुटबॉलचे जनक मानले जाते. बोनी कपूरची निर्मिती असलेल्या या सिनेमात अजय देवगण फुटबॉल कोचची भूमिका साकारीत आहे. खरे तर हा सिनेमाही याच वर्षी प्रदर्शित होणार होता परंतु कोरोनामुळे सिनेमाचे शूटिंग पूर्ण होऊ शकले नव्हते.

हॉकीचा जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावरही सिनेमा बनवण्याची घोषणा निर्माता रॉनी स्क्रूवालाने दोन दिवसांपूर्वी केली आहे. रॉनी स्क्रूवालाची कंपनी आरएसव्हीपी आणि ब्लू मंकी फिल्म्स द्वारा हा सिनेमा तयार केला जाणार असून तो पुढील वर्षी प्रदर्शित केला जाणार आहे. सुप्रतीक सेन आणि अभिषेक चौबे यांनी एक वर्षापूर्वीच या सिनेमाची कथा तयार केली होती. मात्र काही कारणामुळे सिनेमाची घोषणा मागे पडली होती. आता प्रेमनाथ राजगोपालनसोबत रॉनी स्क्रूवाला आणि अभिषेक चौबे एकत्र येऊन या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. मेजर ध्यानचंद यांची भूमिका करण्यासाठी बॉलिवुडमधील एका मोठ्या नायकाची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ध्यानचंद यांनी 1925 ते 1949 पर्यंत भारतीय हॉकी टीमचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी 185 मॅचमध्ये 500 पेक्षा जास्त गोल केलेले आहेत. एवढेच नव्हे तर 1928,1932 आणि 1936 च्या ऑलिंपिकमध्ये त्यांनी भारताला तीन वेळा गोल्ड मेडलही जिंकून दिले होते. 1956 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सम्मानित करण्यात आले होते आणि त्यांच्या स्मरणार्थ त्यांचा जन्मदिवस म्हणजेच 29 ऑगस्टला राष्ट्रीय खेळ दिवस म्हणूनही साजरा केला जातो.

आनंद एल रायनेही भारताचा बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांच्या जीवनावर सिनेमा बनवण्याची घोषणा केली आहे. कलाकारांची निवड अजून झालेली नाही. मात्र पुढील वर्षी हा सिनेमा फ्लोरवर जाणार आहे.

टेनिस स्टार सायना नेहवालच्या जीवनावरही सिनेमा तयार होत असून यात परिणीति चोप्रा सायनाची भूमिका साकारीत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अमोल गुप्ते करीत असून सिनेमाचे नाव ‘सायना’ ठेवण्यात आलेले आहे.

महिला क्रिकेटर मिताली राजच्या जीवनावरही ‘शाबास मिट्टू’ नावाने सिनेमा तयार करण्यात येत आहे, या सिनेमाचे दिग्दर्शन राहुल ढोलकिया करीत असून तापसी पन्नू मिताली राजची भूमिका साकारणार आहे.

ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट शूटर अभिनव बिंद्राच्या जीवनावरही सिनेमा तयार होत असून हर्षवर्धन कपूर अभिनव बिंद्राची भूमिका करीत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कन्नन अय्यर करीत असून अनिल कपूरही या सिनेमात महत्वाची भूमिका साकारीत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER