‘अंतिम’ मध्ये सलमान खान बनणार शीख इन्स्पेक्टर

salman-khan

अखेर सलमान खानने (Salman Khan) ‘अंतिम’ (Antin) चित्रपटात शीख इन्स्पेक्टरची भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट मराठी चित्रपटावर आधारित असल्याने दिग्दर्शक महेश मांजरेकर सलमान खानने मराठी इन्स्पेक्टरची भूमिका करावी असा आग्रह धरला होता. मात्र सलमान खानने चित्रपटाची कथा पंजाबमध्ये नेलेली असल्याने शीख इन्स्पेक्टर साकारण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे सलमानने नक्की कोणता इन्स्पेक्टर साकारायचा यावर शिक्कामोर्तब होत नव्हते. दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि सलमान खान या दोघांनी दोन्ही रूपातील इन्स्पेक्टरच्या ऑडिशन घेऊन नंतर भूमिका फायनल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सलमान खानने मराठी आणि शीख इन्स्पेक्टरचा गेट अप घेऊन ऑडिशन केले. त्यानंतर सलमान खानने शीख इन्स्पेक्टर साकारण्याचा निर्णय घेतला. आता या चित्रपटाचे लवकरच शूटिंग सुरू केले जाणार आहे.

प्रवीण तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटावर आधारित हा चित्रपट असून यात आयुष शर्मा एका गॅंगस्टरची भूमिका साकारत आहे. मुळशी पॅटर्न चित्रपटात पुण्यातील घटना दाखवली असली तरी या चित्रपटात पंजाबमधील गुन्हेगारी दाखवली जाणार आहे.

शीख इन्स्पेक्टरची भूमिका साकारण्याचा निर्णय झाल्यानंतर सलमानने आता या भूमिकेसाठी तयारी करण्यास सुरुवात केली आहे. या भूमिकेत फिट बसण्यासाठी त्याने वजन वाढवण्याचा निर्णय घेतला असून तो दाढीही वाढवणार आहे. हा शीख इन्स्पेक्टर दबंग मधील चुलबुल पांडे सारखा कॉमेडी न होता गंभीर दिसावा त्यानुसार सलमान या भूमिकेची तयारी करू लागला आहे.

सूत्रांनी असेही सांगितले की, सलमान खानला खरेतर शीख इन्स्पेक्टरचीच भूमिका साकारायची होती, परंतु महेश मांजरेकरच्या आग्रहाखातर त्याने मराठी इन्स्पेक्टरच्या भूमिकेचे ऑडिशन दिले होते. या चित्रपटासाठी सलमान खानचे स्टायलिंग एशली रिबेलो आणि अलवीरा अग्निहोत्री करणार आहे. हा चित्रपट हिंदीसह तामिळ, तेलुगू, कन्नड़ आणि उड़िया भाषेतही रिलीज केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER