काँग्रेसने कुलूप उघडले नसते तर आज हा दिवस आला नसता – खा. इम्तियाज जलील

Imtiaz Jalil

औरंगाबाद : काँग्रेसने कुलूप उघडले नसते तर आज हा दिवस आला नसता. त्यामुळे मुस्लिम पर्सनल बोर्डाने ती पाच एकर जागा काँग्रेसलाच दान करावी. त्यांना काँग्रेस भवन बांधायला कामी येईल. असा टोला एमआयएम चे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी लगावला. सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालानंतर मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीनचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदोद्दीन अोवेसी यांनी आमची लढाई नयायासाठी होती. खैरातीसाठी नव्हती. आम्ही पाच एकर जागेसाठी लढलो नाही . अशा रोखठोक शब्दात आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली.

पुढे बोलतांना खा. जलील म्हणाले, सर्वाेच्च न्यायालयाचा आम्ही आदर करतो, मात्र आम्हाला या विषयावर नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार आहे. आमची न्यायालयीन लढाई ही न्यायासाठी होती. पाच एकर जागेच्या खैरातीसाठी नव्हती भारतीय मुस्लिमांची इतकी ऐपत आहे की ते एकटे जागा घेऊन मस्जिद बांधू शकतात.

तर आजचा दिवस उजाडला नसता..
ज्यादिवशी बाबरी पडली, त्या दिवसापासून देशात हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरू झाले. त्याच मुद्यावर भारतीय जनता पार्टी सत्तेत आली. या प्रकारास जेवढे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार आहेत तेवढीच काँग्रेसही जबाबदार आहेत. काँग्रेसच्या तत्कालीन सरकारने मशिदीचे कुलूप उघडले नसते, तर आजचा दिवस उजाडला नसता. देशाला हिंदुराष्ट्र बनवण्याच्या हालचाली सुरू आहेत. फेरविचार याचिकेबाबत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड जी भूमिका घेईल ती आम्हाल मान्य असणार आहे. यासह ती पाच एकर जागाही काँग्रेसला दान देऊ, जेणेकरून तिथे काँग्रेस भवन बांधता येईल. एकंदरीत अशा प्रकारे खा. इम्तियाज जलील यांनी आपला राग व्यक्त केला.