आगामी निवडणुकीत आप-आपापली ताकद दाखवा : इम्तियाज जलील

prakesh ambedkar-and-imtiyaz-jaleel

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत हातात हात घालून लढलेले एमआयएम आणि वंचितची युती अखेर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अगदी तोंडावर संपुष्ठात आली आणि ‘तुम्ही तुमची ताकद दाखवा आम्ही आमची ताकद दाखवितो’ असा निर्वाणीचा इशारा वंचित बहुजन आघाडीला एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी दिल्याने आता या दोन्ही पक्षात वितुष्ट आल्याचे जाहीर झाले आहे.

ही बातमी पण वाचा:- पक्षांतर्गत वादातून जलील यांच्याकडून परस्पर ही भूमिका जाहीर : वंचित बहुजन आघाडी

अद्यापही एमआयएमसोबतची युती तुटली नसल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत असले तरी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी वंचितचा हा दावा फेटाळून लावला आहे. वंचितसोबतची युती तोडण्याचा इतका मोठा निर्णय एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या परवानगी शिवाय घेऊ शकत नाही. हा निर्णय पक्षाचे अध्यक्ष ओवेसी यांनीच घेतला असल्याचे जलील यांनी औरंगाबादमध्ये सांगितले.

यावेळी बोलताना इम्तियाज जलील म्हणाले की, वंचितच्या निर्णयाची किती दिवस वाट पहायची आणि आठ जागा जर देत असतील का शांत बसायचे का? म्हणून आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे जलील यांनी सांगितले. शिवाय आता तुम्ही तुमची ताकद दाखवा आणि आम्ही आमची ताकद दाखवतो, असे आव्हानही वंचित बहुजन आघाडीला दिले.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत गेल्या दोन महिन्यांपासून विधानसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरु होती. मात्र समाधानकारक जागावाटप होत नसल्याने वेगळे होण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांपैकी केवळ ८ जागा एमआयएमसाठी सोडण्यास वंचित आघाडीने तयारी दर्शवली होती, ती आम्हाला मान्य नव्हती, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकरांना भविष्यातील राजकारणासाठी शुभेच्छा आहेत. आमची युती झाली नसली तरी समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. एमआयएम स्वबळावर लढेल, लवकरच औरंगाबादमध्ये इच्छुकांच्या मुलाखती होतील असे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

असे असले तरी वंचित बहुजन आघाडीने ‘वेट अँड वॉच’ अशी भूमिका घेतली आहे.