कलम ३७० रद्द करण्याविरोधात इम्रान खान यांची रा. स्व. संघावर आगपाखड

Imran Khan

इस्लामाबाद : कलम ३७० रद्द केल्याविरोधात पाकिस्तान जंग जंग पछाडत आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडल्यानंतर अमेरिका, रशिया आणि चीनसारख्या देशांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चीनव्यतिरिक्त अन्य देशांनी त्यांच्याकडे लक्ष न दिल्याने इम्रान यांनी थेट रा. स्व. संघावरच आरोप केले आहेत.

या नाट्यमय घडामोडींनंतर पाकिस्तानने भारताशी व्यापार बंद केला होता. तसेच भारताच्या पाकिस्तानातील उच्चायुक्तांना माघारी पाठविले होते. भारताने पुलवामासारख्या हल्ल्याला निमंत्रण दिल्याची धमकीही दिली होती. इम्रान खानने अमेरिका, रशिया आणि चीन यांना हस्तक्षेप करण्यास सांगितले होते. मात्र, चीनने विरोध नोंदवत हस्तक्षेपास नकार दिला होता. तर अमेरिका आणि रशियाने हात आखडते घेतले आहेत. यामुळे त्यांच्याकडून निराशा पदरी पडल्याने इम्रान खान यांनी संघावर ट्विटरद्वारे टीका केली आहे.

संघ नाझी विचारसरणीच्या प्रभावाखाली आल्याने काश्मीरमध्ये जमावबंदीची स्थिती आहे, असे ट्विट इम्रान खान याने केले आहे. यावर भाजपकडून राम माधव यांनी प्रत्युत्तर देताना आम्ही जिनांच्या दोन देश आणि शेख अब्दुल्लांच्या तीन देशांच्या सिद्धांताला संपविले आहे. इम्रान खान यांनी भारतामध्ये लक्ष घालण्यापेक्षा पाकिस्तानातील धार्मिक अतिवादाला संपवून दाखवावे, असे आव्हान दिले आहे. हिटलरने केलेल्या नरसंहारावेळी जसे आंतरराष्ट्रीय समूहाने तोंड बंद ठेवले होते, तसेच भारतावेळी शांत राहणार का, असा प्रश्नही त्यांनी  जगभरातील देशांना केला आहे.