नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत सुधारणा

आता पाच हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांना लाभ, अर्थसहाय्यातही वाढ

ND

मुंबई : जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यात आली असून त्यामुळे यापूर्वी अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांपुरता देय असलेला या प्रकल्पाचा लाभ आता 2 ते 5 हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार आहे. या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली.

विदर्भ व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त आणि हवामान बदलास अतिसंवेदनशील असणारी 4 हजार 210 गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदी खोऱ्यातील खारपाण पट्ट्यातील 932 गावे अशा एकूण 5 हजार 142 गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (हवामान अनुकूल कृषी प्रकल्प) राबविण्यात येत आहे. हवामान बदलांना अनुकूल असा कृषी विकास करुन शेतकरी व एकंदर कृषी क्षेत्रास सक्षम करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना यामध्ये करण्यात येत आहेत. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे 4 हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये राबविला जात आहे. ही अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी प्रकल्प सुकाणू समितीदेखील स्थापन करण्यात आली आहे.

ही बातमी पण वाचा : संजय घोडावत यांना कर्मवीर विद्याभूषण पुरस्कार जाहिर

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याविषयीच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. या सुधारणांनुसार, प्रकल्प गावातील अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांबरोबरच आता 2 ते 5 हेक्टरपर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांनादेखील प्रकल्पांतर्गत विविध बाबींसाठी लाभ दिला जाणार आहे. प्रकल्प गावातील अत्यल्प व अल्प भूधारक शेतकरी आणि भूमिहीन कुटुंबे यांना वैयक्त‍िक लाभाच्या बाबींसाठी अर्थसहाय्याचे प्रमाण 50 टक्क्यांवरुन आता 75 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे. तसेच 2 ते 5 हेक्टरपर्यंत जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना 65 टक्के अर्थसहाय्य दिले जाणार आहे. कृषी यांत्रिकीकरणासाठी शेतकरी गटांना 60 टक्क्यांच्या मर्यादेत अनुदान दिले जाईल.