नळाच्या पाण्याचा अपव्यय केल्यास पाच वर्षे  कारावास

केंद्र सरकारचा नवा कडक नियम

Tap Waater

नवी दिल्ली :- भूगर्भातील जलसाठ्यांचा (Ground Water) उपसा करून शहरांमध्ये नळाने पुरविल्या जाणाऱ्या  पिण्याच्या पाण्याचा अपव्यय व दुरुपयोग करणे यापुढे महाग पडणार आहे. केंद्र सरकारने असे करणे हा दंडनीय गुन्हा ठरविला असून त्यासाठी एक लाख रुपये दंड व पाच वर्षांचा कारावास अशा शिक्षेची तरतूद केली आहे.

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय भूगर्भजल प्राधिकरणाने (National Ground Water Authority) पर्यावरणरक्षण कायद्यातील अधिकार वापरून  हा नवा नियम केला असून तशी अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (National Green Tribunal) दिलेल्या निर्देशानुसार सरकारने हे पाऊल उचलले आहे. एकीकडे देशातील भूगर्भ जलसाठ्यांची पातळी दिवसेंदिवस  खालावत आहे व दुसरीकडे लोकांची पाण्याची नासाडी करण्याची प्रवृत्ती वाढत आहे.  याविषयी चिंता व्यक्त करून न्याायाधिकरणाने पाण्याची नासाडी व दुरुपयोग हा दंडनीय अपराध ठरविण्यास सांगितले होते.

नव्या अधिसूचनेनुसार पाण्याची नासाडी करण्याच्या पहिल्या गुन्ह्यासाठी एक लाख रुपयांपर्यंत दंड व पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकेल. तरीही नासाडी व दुरुपयोग सुरूच राहिल्यास दंडाची रक्कम प्रत्येक दिवसाला पाच हजार रुपयांपर्यंत वाढविली जाईल.

शहरांना पाणीपुरवठा करणार्‍या संस्थांना वाहतूक व वितरणामध्ये पाण्याची चोरी, गळती, नासाडी व दुरुपयोग होणार नाही यासाठी सक्त उपाय योजण्यास सांगण्यात आले असून उल्लंघन करणार्‍यांवर तत्परतेने कारवाई न केल्यास संबंधित अधिकार्‍यांना जबाबदार धरले जाईल, असे बजावण्यात आले आहे.

सरकारी आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी पाऊस, हिमवृष्टी यासारख्या नैसर्गिक मार्गाने ४००० अब्ज घनमीटर (Billion Cubic Meter-BCM) बाष्पीभवन व समुद्रात वाहून गेल्यानंतर यापैकी फक्त ११२२ अब्ज घनफूट वापरासाठी उपलब्ध होते. सन २०११ ते २०२५ या काळात देशातील पिण्यायोग्य पाण्याची दरडोई उपलब्ध २५ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता असून २०३६ पर्यंत ही उपलब्धता आणखी कमी होऊन तिच्यात ३६ टक्के घट होण्याची भीतिदायक शक्यता आहे.

मंत्रालयाचे सचिव यू. पी. सिंग म्हणाले की, या दंडात्मक  कारवाईसोबतच पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी लोकांमध्ये जागृती करणेही तेवढेच महत्त्वाचे  आहे. संडासात फ्लश करताना, आंघोळ करताना, हात-तोंड धुताना तसेच स्वयंपाकघरातील कामे करताना पाण्याचा गरजेपेक्षा जास्त अनावश्यक वापर होतो. तसेच पाण्याच्या टाक्या भरून वाहण्याने, पाईपलाईन गळकी असल्याने, गळके नळ वेळीच दुरुस्त न करण्याने खूप पाणी रोज वाया जात असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER