मतदान यंत्रांत फेरफार अशक्यच; शास्त्रज्ञांचा दावा

EVM

पुणे : ईव्हीएममध्ये  (इलेट्रॉनिक व्होटिंग मशीन) काहीही फेरफार करणे अशक्य आहे; कारण त्याला बाहेरून दुसरे कोणतेही यंत्र, नेटवर्क जोडण्याची सोय नाही. त्यामुळे याबाबतच्या वावड्या निराधार आहेत. आरोप अनेकांनी केले; पण आजपर्यंत एकाही राजकीय पक्ष, नेत्याने त्याबाबत तक्रार करण्याची हिंमत दाखवलेली नाही, या शब्दात ‘भेल’च्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ईव्हीएमबाबतचे आक्षेप फेटाळले. ईव्हीएमची निर्मिती ‘भेल’च करते.

याबाबत संबंधित सूत्रांनी सांगिलते की, भारतीय शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांनी अत्यंत विचारपूर्वक मतदानयंत्रे  विकसित केली आहेत. या यंत्रांना बाहेरून दुसरे कोणतेही यंत्र, नेटवर्क जोडण्याची सुविधा नाही. या यंत्रांची अभियांत्रिकी रचना अत्यंत सुरक्षित आहे. त्यामुळे मतदानयंत्रांचे हॅकिंग करणे शक्यच नाही.

अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीओईपी) पाच वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्राची निर्मिती केली. ही  कल्पना डॉ. एस. पी. महाजन, एस. डी. आगाशे यांनी मांडली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील रोबो स्टडी सर्कलच्या विद्यार्थ्यांनी सात महिने संशोधन करून मतदानयंत्र विकसित केले. तेव्हापासून महाविद्यालयातील निवडणूक मतदानयंत्राद्वारेच केली जाते. सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणात काही राजकीय पक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मतदानयंत्रे हॅक केले जात असल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर मतदानयंत्राची अभियांत्रिकी रचना, हॅकिंगची शक्यता या अनुषंगाने सीओईपीचे प्रा. एस. डी. आगाशे यांनी मतदानयंत्रे हॅक करणे शक्य नाही, असे निःसंदिग्धपणे सांगितले.

ही बातमी पण वाचा : निवडणुक आयुक्त अशोक लवासांचा बैठकांवर बहिष्कार

मतदानयंत्रांची निर्मिती मतदानाची प्रक्रिया सोपी करण्यासाठी केलेली आहे. एखाद्या खासगी संस्थेने ही यंत्रे विकसित केली असती, तर त्यात त्यांचे अनैतिक हेतू असतील म्हणून गैरप्रकार होण्याची शक्यता विचारात घेता आली असती. मात्र, ही यंत्रे ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स’ या सरकारी कंपनीच्या शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांनी विकसित केली आहेत. हे मतदानयंत्र म्हणजे संपूर्णत: स्वतंत्र असा इलेक्ट्रॉनिक संच आहे. त्याला बाहेरून काहीही जोडण्याची सुविधा नाही, नेटवर्कही जोडता येत नाही, ती एकमेकांशीही जोडलेली नाहीत. त्यामुळे ती रिमोटने हॅक होऊ शकत नाहीत’ असे प्रा. आगाशे म्हणाले.

कोणतेही तंत्रज्ञान पहिल्या फटक्यात यशस्वी ठरत नाही. चुका होऊन, त्या सुधारूनच ते परिपक्व होते. इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्र ही भारतीय शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांची उत्तम कामगिरी आहे. ही यंत्रे येत्या काळात आणखी विकसित आणि अद्ययावत होतील. शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांचे कौतुक करण्याऐवजी त्यावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याऐवजी आपण पुन्हा कागदी मतपत्रिकांचा स्वीकार करून मागे जाणार आहोत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मतदानयंत्रे हॅक करण्याची शक्यता, यंत्रांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित करण्यामागे राजकीय पक्षांचे, नेत्यांचे राजकारण आहे, असे मतदानयंत्रांची  उत्पादक कंपनी ‘भेल’च्या उच्चपदस्थ सूत्रांनी म्हटले आहे. मतदानयंत्रे हॅक होऊच शकत नाहीत; कारण त्याला बाहेरून दुसरे यंत्र, नेटवर्क जोडण्याची यंत्रणाच नाही. मतदानयंत्रांच्या सुरक्षिततेचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानेही दिलेला आहे. मतदानयंत्रे हॅक झाली असतील, तर राजकीय पक्षांनी, नेत्यांनी बिनधास्त तक्रार करावी, निवडणूक आयोगाला त्याचा तपशील द्यावा. मात्र, आजपर्यंत एकाही राजकीय पक्ष, नेत्याने त्याबाबत तक्रार करण्याची हिंमत दाखवलेली नाही.