‘झिरो ते हिरो’ने करून दाखवले इम्पॉसिबल पॉसिबल !

Rahul Tewatia

राजस्थान (Rajsthan Royals) सामना हरला तर तो ह्याच्यामुळे हरेल, अरे…ह्याला कुणी रिटायर करा, संजू सॅमसनच (Sanju Samson) एकटा दोन्ही टोकाला धावा करतोय- अशा शब्दांत जो टीकेचे लक्ष्य झाला होता त्या राजस्थानच्या राहुल तेवटियाची (Rahul Tewatia) रविवारची किंग्ज इलेव्हनविरुद्धची (Kings XI Punjab) खेळी म्हणजे ‘झिरो ते हिरो’ अशी होती. त्याच्या या खेळीनेच राजस्थानला इम्पॉसिबल ते पॉसिबल करून देत रॉयल विजय मिळवून दिला.

खरं सांगायचं तर कालपर्यंत राहुल तेवटिया हे नाव कुणाला फारसं माहीत नव्हतं; पण आता हे नाव कुणीच विसरू शकणार नाही. पहिल्या २३ चेंडूंत फक्त १७ धावा- त्यात १२ डॉट बॉल आणि नंतर फक्त आठ चेंडूंतच ३६ धावा. त्यात सहा षटकार आणि फक्त दोनच डॉट बॉल. राहुलने निर्णायक क्षणी ही जी गाडी टॉप गिअरमध्ये टाकली त्यामुळेच रॉयल्सला १८ चेंडूंत ५१ धावांचे डोंगराएवढे आव्हान असतानाही तीन चेंडू शिल्लक राखून विजय मिळवता आला. राहुलला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला धाडण्यात आले तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या; पण राहुल म्हणतो, माझ्या सहकाऱ्यांना माहीत होते की, मी हाणू शकतो. प्रश्न फक्त एकाच षटकाराचा होता; पण ते होत नव्हते. माझ्या कारकिर्दीतील सर्वांत खराब २० चेंडू मी खेळलो. लेगस्पिनर्सना मी फटकावू शकलो नाही म्हणून इतरांवर हल्ला चढवला आणि शेल्डन कॉट्रेलला एकाच षटकात पाच षटकार लगावले ते तर अविश्वसनीय होते, असे त्याने म्हटले आहे. डावातील त्या १८ व्या षटकात राहुलने जो हल्ला चढवला तो ६, ६, ६, ६, ० आणि ६ असा होता. आयपीएलमध्ये केवळ दुसऱ्यांदाच एका षटकात पाच षटकार लागले होते.

यापूर्वी २०१२ मध्ये,आरसीबीच्या ख्रिस गेलने पुणे वॉरियर्सच्या राहुल शर्माला सलग पाच षटकार लगावले होते. राहुल तेवटिया हा मूळचा हरियाणाचा. खरं तर गोलंदाजच…लेगस्पिनर. तो डावखुरा फलंदाज म्हणून स्टिव्ह स्मिथने त्याला बढतीवर पाठवले. राजस्थानच्या फलंदाजी फळीतील तो एकमेव डावखुरा फलंदाज होता. तो फलंदाजीला आला तेव्हा चाचपडत होता. चेंडू बॅटवर घेता येत नव्हता. दुसरीकडे विजयाचे लक्ष्य एवढे मोठे होते की एकही चेंडू वाया घालून चालणार नव्हता. पण राहुल १२ डॉट खेळून गेला होता आणि आता राजस्थान हरला तर याच्यामुळेच हरणार असे समालोचक म्हणू लागले होते. तो धोके पत्करायला आणि क्रीझ सोडून बाहेर यायला तयार नव्हता. जागच्या जागी खेळून काहीच होत नव्हते. अशातच सॅमसनही बाद झाला आणि तेवटियावरील दडपण अधिकच वाढले. अशा वेळी विंडीजचा जलद गोलंदाज शेल्डन कॉट्रेल गोलंदाजी करायला आला आणि त्याच्याच गतीचा वापर करत तेवटियाने गिअर बदलले. बाऊन्सर त्याने लाँग लेगला भिरकावला. पुढचा आखूड चेंडू त्याने स्क्वेअर लेगकडे असा भिरकावला की तो थेट मैदानाबाहेर रस्त्यावर जाऊन पडला. पुढच्या चेंडूवरचा षटकार वाईड लाँग ऑफला होता. आणि पुढचा फूल टॉस मिडविकेटला सीमापार झाला. पुढचा चेंडू डॉट आणि पुन्हा षटकार … एकाच षटकात पाच षटकार… तेवटियाने टीकाकारांना गप्प तर केलेच; शिवाय सामनाही फिरवला होता. पुढच्या षटकात मोहम्मद शमीला आणखी एक षटकार मारून तो बाद झाला; पण तोवर विजय दृष्टिपथात आलेला होता. तेवटिया हा २७ वर्षांचा. २०१३ पासून तो प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतोय; पण आतापर्यंत तो प्रथम श्रेणीचे सातच सामने खेळलाय.

मर्यादित षटकांचेच सामने तो अधिक खेळला आणि त्यात हरियाणासाठी त्याने ९१ धावांची खेळीसुद्धा केली आहे. २०१४ मध्ये आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्ससाठी खेळला. २०१७ ला तो किंग्ज इलेव्हनकडे होता; पण त्याला एकही संधी मिळाली नाही. २०१८ च्या मोसमात दिल्लीने त्याला आठ सामन्यांत खेळवले आणि गेल्या वर्षी तो पुन्हा रॉयल्सच्या तंबूत परतला. राष्ट्रीय स्तरावर टी-२० च्या सामन्यांमध्ये त्याचा स्ट्राईकरेट १५३ आहे. कदाचित तोच बघून स्टिव्ह स्मिथने त्याला वरच्या क्रमांकावर पाठवले असावे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER