
- अमान्यताप्राप्त कॉलेजातून मान्यताप्राप्त कॉलेजात स्थानांतर नाही
नवी दिल्ली : ज्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदवीला भारत सरकारची मान्यता नाही अशा महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याचे मान्यताप्राप्त विद्यालयात स्थानांतर (Migration) केले जाऊ शकत नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या वैद्यकीय पदवी शिक्षणक्रमाच्या नियमावलीतील नियम क्र. ६(२) व ११(२) च्या अनुषंगाने न्या. एल. नागेश्वर राव आणि न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.न्यायालयाने स्पष्ट केले की, हे दोन्ही नियम सुसंगतपणे वाचले तर स्पष्ट होते की, दोन्ही महाविद्यालयांच्या पदव्यांना मान्यता असेल तरच विद्यार्थ्याच्या एका कॉलेजमधून दुसर्या कॉलेजात स्थानांतरास परवानगी दिली जाऊ शकते.
नियम क्र. ६(२) स्थानांतरासंबंधीचा आहे तर नियम ११(२) वैद्यकीय पदव्यांना मान्यता देण्यासंबंधीचा आहे. केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या वैद्यकीय पदव्या व त्यांचे शिक्षण देणारी कॉलेजे यांची यादी मेडिकल कौन्सिल कायद्याच्या परिशिष्ट-१ मध्ये दिलेली असते. यामुळे काही वेळा असे घडू शकते की, एखाद्या मेडिकल कॉलेजला मान्यता आहे पण तेथील काही वैद्यकीय पदव्यांना मान्यता नाही. न्यायालयाने म्हटले की, हे नियम पाहता पदवीला मान्यता नसलेल्या कॉलेजातून पदवीला मान्यता असलेल्या कॉलेजात तसेच खासगी कॉलेजातून सरकारी कॉलेजात विद्यार्थ्याचे स्थलांतर होऊ शकत नाही.
राजस्थानमधील आंचल परिहार या विद्यार्थिनीच्या प्रकरणात मेडिकल कौन्सिलने केलेले अपील मंजूर करताना हा निकाल दिला गेला. आंचल सध्या राजसमंद येथील अनंता इस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अॅण्ड रीसर्चमध्ये ‘एमबीबीएस’च्या तिसर्या वर्षात शिकत आहे. या कॉलेजला मान्यता आहे, परंतु तेथील ‘एमबीबीएस’ पदवीला मान्यता नाही. आंचलने या कॉलेजमधून जोधपूर येथील डॉ. एस. एन.मेडिकल कॉलेज या सरकारी कॉलेजात स्थानांतरित होण्यासाठी अर्ज केला. यासाठी अनंता व एस. एन. या दोन्ही कॉलेजांनी तिला ‘ना हरकत दाखले’ दिले. परंतु राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालकांनी मेडिकल कौन्सिलच्या नियमांवर बोट ठेवून तिच्या स्थानांतरास मान्यता दिली नाही. म्हणून आंचलने राजस्थान उच्च न्यायालयात रिट याचिका केली. तेथे आधी एकल न्यायाधीशाने व नंतर द्विसदस्यीय खंडपीठाने तिच्या बाजूने निकाल दिले. याविरुद्ध मेडिकल कौन्सिलने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते.
उच्च न्यायालयाने असा निकाल दिला होता की, नियम ६(२) मध्ये अभिप्रेत असलेले स्थलांतर फक्त कलम ११(२) नुसार मान्यता असलेल्या पदव्यांपुरते मर्यादित नाही, दोन्ही कॉलेजांना मान्यता असली की पुरेशी आहे. दोन्ही कॉलेजांच्या पदव्यांना मान्यता असण्याची गरज नाही. हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने चुकीचा ठरविला. शिवाय आंचलचे स्थलांतर अमान्य करताना न्यायालयाने आणखीही एक बाब विचरात घेतली. आंचल ‘ओबीसी’ प्रवर्गातील आहे. तिला ‘नीट’ परीक्षेत ७२० पैकी फक्त ११० गुण मिळाले होते व तिचा देश पातळीवरील गुणवत्ता क्रमांक ६,७३,८९८ असा होता. आंचलने ज्या वर्षी अनंता कॉलेजात एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला त्यावर्षी एस. एन. कॉलेजमधील ‘ओबीसी’ प्रवर्गासाठीचे ‘कटआॅफ’ गुण ५६० एवढे होते.
अजित गोगटे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला