काँग्रेसच्या ‘त्या’ नाराज नेत्यांची लवकरच बैठक, रणनीती आखणार

Congress Flags

नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) अध्यक्षपदाच्या निवडीवरून राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस नेत्यांमध्ये असलेली नाराजी दिसून आली आहे. सोमवारी (दि. २४ ऑगस्ट) रोजी कार्यसमितीच्या झालेल्या वादळी बैठकीमध्ये पुन्हा एकदा सोनिया गांधी यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. मात्र, यावेळी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर काँग्रेसच्या तब्बल २३ दिग्गज नेत्यांनी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती.

काँग्रेसला पुन्हा उभारी मिळावी यासाठी पक्षसंघटनेत मोठे बदल करण्याचा आग्रह धरणारे व त्यासाठी संघर्ष करणाऱ्या २३ नेत्यांच्या मुद्द्यांकडे पक्षश्रेष्ठींनी बगल दिली असल्याने हे नेते कमालीचे नाराज झाले आहेत. त्यामुळे आपली पुढची रणनीती ठरविण्यासाठी या नाराज नेत्यांची पुढच्या आठवड्यात एक बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

काँग्रेसने दहा नेत्यांची एक समिती स्थापन केली असून त्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांतील प्रत्येकी पाच काँग्रेस खासदारांना या समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे. परंतु या समितीमध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) समर्थकांचाच समावेश असल्याने काँग्रेस पक्ष बळकटीसाठी गांधी घराणे वगळता अध्यक्षपद इतर व्यक्तीला द्यावे अशी भूमिका असलेल्या या नाराज नेत्यांमध्ये भर पडली आहे.

आता, पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी ठोस पावले उचलण्याकरिता काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी हे नाराज नेते नवी रणनीती आखण्याच्या तयारीत आहेत. यासाठीच पुढील पावले निश्चित करण्यासाठी एक बैठक होणार असल्याचे वृत्त लोकमतने दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER