राज्यातील प्रकल्पांसाठी गडकरी, जयंत पाटील आणि फडणवीस यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक

Important meeting between Nitin Gadkari, Jayant Patil and Devendra Fadnavis

नवी दिल्ली :- देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील नेते विकासासाठी राजकीय वैर बाजूला ठेवतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. राजकारणात एकमेकांवर कितीही आरोप-प्रत्यारोप केले तरी जेव्हा राज्याच्या हिताचा आणि विकासाचा प्रश्न पुढे येतो तेव्हा महाराष्ट्रातील नेते एका छताखाली एकत्र येऊन तो प्रश्न सोडवतात हेसुद्धा अधोरेखित झालं आहे. बुधवारी केंद्रीय पर्यावरणमंत्री नितीन गडकरी, राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे (NCP) नेते जयंत पाटील यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक  झाली.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या दिल्लीतल्या घरी जाऊन बैठक घेतली. यावेळी भाजपचे खासदार गिरीश बापट, खासदार सुनील मेंढे, नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी, महापालिका आयुक्त, अधिकारी, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नागपूरमधील गोसेखुर्द प्रकल्प, नाग नदी आणि मुळा-मुठा नदीच्या पुनरुज्जीवनाबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी गोसेखुर्द प्रकल्प २०२३ पर्यंत पूर्ण करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या प्रकल्पासाठी एकूण पाच हजार कोटींचा खर्च येणार आहे. मात्र, दरवर्षी १५०० कोटी रुपये जरी मिळाले तरी हा प्रकल्प दोन वर्षांत मार्गी लागेल, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

नागपूरच्या  पुरातन नाग नदीचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. हा प्रकल्प एकूण १७०० कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मंजुरीही मिळाली होती. मात्र, कोरोनामुळे हे काम थांबलं होतं. कोरोनामुळे आर्थिक संकट उभं राहिल्यानं  सरकारनं  कोणताही नवा प्रकल्प हाती न घेण्याचं ठरवलं होतं. मात्र, केंद्रीय अर्थमंत्र्यांशी बोलून हा प्रकल्प सुरू करण्याची परवानगी मिळवली आहे. त्यामुळे आता सल्लागार वगैरे नेमून टेंडर प्रक्रिया सुरू करू.  त्यामुळे लवकरच हा प्रकल्प मार्गी लागेल, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.

मुळा-मुठा प्रकल्प पूर्ण होणार
या बैठकीत पुण्यातील मुळा-मुठा नदीचं पुरुज्जीवन करण्याचा निर्णय घेण्यात आला. १२०० कोटींचा हा प्रकल्प आहे, तो लवकरात लवकर पूर्ण करण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला.

ही बातमी पण वाचा : 15 वर्षे जुनी झालेली वाहनं 1 एप्रिलपासून थेट भंगारात; गडकरींची मंजुरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER