तिळाचे महत्त्व मकरसंक्रांतीच्या निमित्ताने !

तिळगुळ - मकर संक्रांती

भारतीय सणवार, आहारपद्धती इतक्या शास्त्रीय पद्धतीने योजले आहेत याचे प्रत्यंतर आपल्याला वेळोवेळी येत असते. सणाच्या निमित्ताने ऋतुनुसार आवश्यक गोष्टी आपल्या आहारात समाविष्ट होतात. कोणताही सण आनंद, उत्साह, कामाचा हुरूप, नित्य दैनंदिन जीवनातील मरगळ दूर करून उभारी उमेद आणणारा असतो. आपल्याकडे इतके सणवार आहेत की कोणता “डे” साजरा करण्याची तशी गरजच नाही. सर्वांनी एकत्र येणे, सण साजरा करणे, नवीन पदार्थ बनविणे खाणे, खाऊ घालणे हे सर्व मानसिक आजारांची एक चिकित्साच आहे.

असाच एक सण म्हणजे मकरसंक्रांत. या दिवशी तिळाचे विशेष महत्त्व. तिळगुळ, चिक्की, लाडू, वड्या कितीतरी प्रकारे तिळाचे पदार्थ बनविल्या जातात. तिळ आरोग्याकरीता कसे उपयोगी आहे ते बघूया –

तिळ पचायला जड स्निग्ध आणि गरम असतात. थंडीचा ऋतु सुरु असल्याने पाचन शक्ति उत्तम असते. परंतु थंडी, रुक्षता यापासून बचाव देखील आवश्यक असतो. तिळ हे या सर्वच अवस्थांकरीता उत्तम पर्याय आहे.

  • तिळ वातशामक, संधान करणारे आहे.
  • तिळ चावून चावून खाल्याने दात मजबूत होतात.
  • मूळव्याधीमधे तिळ लोण्यासह खातात. रक्त पडत असेल तर रक्तस्राव बंद होण्यास मदत होते.
  • प्रमेहात अशक्तपणा, वारंवार मूत्रप्रवृत्ती होत असते. तिळ बल वाढविणारे तसेच मूत्र प्रवृत्ती कमी करणारे असल्याने प्रमेहात उपयुक्त आहे.

स्त्रियांचे मासिक त्रास, मासिक पाळीच्या वेळी पोट कंबर दुखणे पाळी साफ न येणे यावर तिळ खाणे किंवा काळ्या तिळाचा काढा करून घेतल्यास खूप लाभ होतो. तिळ आर्तवजनन म्हणजेच पाळी आणणारे आहे. त्यामुळे ज्यांची पाळी नियमित नसेल त्यांना फायदेशीर ठरतात. आर्तव जनन असल्याने गर्भिणीने जपूनच घ्यावे.

  • तिळाचे लाडू बल वाढविणारे असतात त्यामुळे दौर्बल्य असल्यास नक्की खावे.
  • तिळ स्तन्यजनन म्हणजेच बाळंतिणीचे दूध वाढविणारे आहे. त्यामुळे बाळंतिणीस तीळ भाजून रोज थोडे खाण्यास द्यावे.
  • तिळ स्निग्ध असल्याने तिळ वाटून स्नानाच्यावेळी शरीरावर घासल्यास थंडीच्या दिवसात येणारी त्वचेची रुक्षता, पायाला भेगा, ओठ फाटणे या तक्रारी दूर होतात. त्वचा मुलायम व उजळ बनते.
  • तिळ केसांकरीता उत्तम आहे. काळे तिळ वाटून त्याचा लेप केसांना लावल्यास केस काळेभोर तसेच चमकदार होतात.
  • असे गुणकारी तिळ थंडीपासून रक्षा करणारे बल देणारे तिळगुळाच्या रुपात नक्कीच ग्रहण करावे.

ह्या बातम्या पण वाचा :

Vaidya Sharwari Sandeep Mishal

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER