‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा’, आठवलेंची राष्ट्रपतींकडे मागणी

Ramdas Athwle - Ramnath kovind - Maharastra Today

नवी दिल्ली : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी राष्ट्रपतींकडे केली. महाराष्ट्रात बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था; कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकारला आलेले अपयश; राज्य सरकारवरून जनतेचा उडालेला विश्वास पाहता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी या मागणीचे निवेदन दिल्याची माहिती आठवले यांनी माध्यमांना दिली.

यावेळी झालेल्या चर्चेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीचा विचार करू असे आश्वासन राष्ट्रपतींनी दिल्याची माहितीही त्यांनी दिली. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांची गाडी आणि त्यानंतर झालेल्या घटनाक्रमात महाराष्ट्रच्या गृह विभागाची प्रतिमा कलंकित झाली आहे. सचिन वाझे प्रकरण; त्यानंतर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप, महिन्याला १०० कोटींची हफ्ता वसुली या सारख्या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या गृह विभागाची प्रतिमा डागाळली आहे. त्याबरोबर जनतेत भीतीचे वातावरण आहे. कोरोनाच्या महामारीचा महाराष्ट्रात वेगाने फैलाव होत आहे. तीन पक्षांचे राज्य सरकार निर्णय घेण्यात कमालीचे उदासीन असून राज्याचा विकास खुंटला आहे.

नाकर्तेपणा असलेल्या राज्य सरकारमुळे जनतेत निराशेचे वातावरण आहे. वादळ, कोरोना संकट सर्व आघाड्यांवर निष्क्रिय राहिलेले महाविकास आघाडीचे राज्य सरकार आहे. महाराष्ट्राचे राज्य सरकार त्वरीत बरखास्त करून येथे राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी असून त्याबाबत चे निवेदन देण्यात आले. राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत विचार करू असे अश्वासन राष्ट्रपतींनी दिले असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER