एका जाहिरातीचे आठ कोटी घेणाऱ्या दीपिकाला मोठा फटका

Deepika Padukone

मुंबई :- बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका हिचा ‘छपाक’ चित्रपट सर्वांनाच भुरळ घालतो आहे. तर दुसरीकडे तिच्या जेएनयू भेटीमुळे तिला मोठं नुकसान सहन करावं लागतंय. सध्या जाहिरातींमधून सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री दीपिका आहे. ती ब्रिटानिया गुड डे, लॉरियल, तनिष्क अशा एकूण २३ नामवंत ब्रॅण्डची अम्बॅसिडर आहे. मात्र असे असताना तिच्या जेएनयू भेटीमुळे सर्व ब्रॅण्डनी तिच्याकडे पाठ फिरवली आहे. जोपर्यंत जेएनयू वाद पूर्णपणे निवळत नाही तोपर्यंत किमान दोन आठवडे तिच्या जाहिराती बंद ठेवण्याचा निर्णय सर्व जाहिरातदारांनी घेतला असून याचा दीपिकाला मोठा फटका बसला आहे. दीपिका एका चित्रपटासाठी १० कोटी तर एका जाहिरातीसाठी ८ कोटी रुपये मानधन घेते.

राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ५ जानेवारी रोजी मध्यरात्री हल्ला झाला. तोंडावर फडकं बांधलेल्या काही अज्ञातांनी विद्यापीठात घुसून शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर हा हल्ला केला होता. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. अनेक ठिकाणी आंदोलने, निदर्शने करून या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. या उसळलेल्या संतापाच्या लाटेत दीपिका पदुकोणने जेएनयूतील जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि नेमका हा काळ होता तिच्या ‘छपाक’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा. त्यामुळे तिच्यावर सडकून टीका करण्यात आली.

दीपिका अभ्यास कर! रामदेव बाबांचा सल्ला

छपाकच्या प्रदर्शनासाठी दीपिका त्या ठिकाणी पोहचली, अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या. तिच्या ‘छपाक’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदीची मागणी करण्यात आली. तर दुसरीकडे तिच्या बाजूनेही लोक उभे राहिले. दीपिकाची उपस्थिती म्हणजे जेएनयू हल्ल्याविरोधात बॉलिवूडचा आवाज असल्याचे म्हटले गेले. या पाठिंब्यामुळे प्रचंड विरोधानंतर तिचा ‘छपाक’ चित्रपट ठरलेल्या दिवशीच प्रदर्शित झाला आणि अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ या तगड्या चित्रपटाला आव्हान देत बॉक्स ऑफिसवर उभा राहिला आहे. त्यामुळे या चित्रपटाला जास्त फटका बसलेला नाही…पण फटका बसला तो दीपिकाला.

धास्तावलेल्या जाहिरातदारांनी तिच्या जाहिराती बंद केल्या

कलाकारांनी राजकीय भूमिका घेतल्याने प्रशासनाची नाराजी ओढवून घेण्याची भीती जाहिरात कंपन्यांना वाटत आहे. कोकाकोला, अ‍ॅमेझॉन इत्यादी कंपन्यांची जाहिरात करणाऱ्या आयपीजी मीडिया ब्रॅण्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी सिन्हा यांनी याबाबत सांगितले, ‘सामन्यत: काही प्रमुख ब्रॅण्ड कोणत्याही वादात अडकण्याचा धोका पत्करू शकत नाहीत. त्यामुळे भविष्यात विविध ब्रॅण्ड सेलिब्रिटींकडून राजकीय मताबाबत करारही करू शकतात.’