तीन वर्षांपासून रखडलेले मराठी सिनेमांचे अनुदान मिळावे म्हणून ‘इम्पा’ने पाठवले सरकारला पत्र

IMPPA

राज्य सरकारने नुकताच मराठी भाषा दिवस साजरा केला. यावेळी सर्व मंत्र्यांनी मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करावा असा संदेश सगळ्यांना दिला. पण मंत्रालयाच्या समोर मराठी लक्तरे नेसून उभी असल्याचे जे वि. वा. शिरवाडकर म्हणाले होते ते आजही कायम असल्याचे दिसत आहे. मराठी माणसाच्या उद्धारासाठी स्थापन झालेली शिवसेना आज सत्तेत आहे पण मराठी सिनेमासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाबाबत मात्र सरकार गप्प आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी मुंबईत येऊन सिने निर्मात्यांना उत्तर प्रदेशमध्ये सर्व सवलती देऊन फिल्मसिटीची निर्मिती करणार असल्याची घोषणा केली तेव्हा. सरकारमधील काही मंत्र्यांनी फिल्मसिटी मुंबईतून हलवू देणार नाही अशा गर्जनाही केल्या होत्या. मात्र गेल्या तीन वर्षांपासून मराठी सिनेमांचे सरकारी अनुदान बंद असून यासाठी समितीही नेमण्यात आलेली नसल्याचे समोर आले आहे. बरं याबाबत मराठी सिने इंडस्ट्रीतील कोणी आवाज उचललेला नाही तर हिंदी निर्मात्यांची संस्था असलेल्या ‘इम्पा’ने उचलला आहे. आणि यासाठी ‘इम्पा’ने सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांना पत्रही पाठवले आहे.

याबाबत माहिती देताना इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर्स असोसिएशन (इम्पा)चे अध्यक्ष टी. पी. अग्रवाल यांनी सांगितले, मराठी सिने इंडस्ट्रीने गेल्या काही काळात चांगलीच प्रगती केली आहे. त्यामुळेच अनेक अमराठी नायक-नायिकांनी मराठी सिनेमांची निर्मितीही केली. त्यामुळेच मागील एक दशक हे मराठी सिनेमासाठी सुवर्णकाळ असल्याचे म्हटले जाते. पण आता मराठी सिनेमांची निर्मिती कमी होऊ लागली आहे. आणि याला कारण आहे राज्य सरकार. राज्य सरकारने मराठी सिनेमासाठी विविध योजनांची आखणी केली पण या योजना काही पूर्णत्वास गेल्या नाहीत. गेल्या तीन वर्षांपासून मराठी सिनेमांचे अनुदान सरकारने दिलेले नाही. यावेळी सरकारकडे 300 पेक्षा जास्त निर्मात्यांचे अर्ज अनुदानासाठी पडून आहेत. सरकारने अनुदान समितीही अजून नेमलेली नाही. काही अधिकाऱ्यांच्या हातात कारभार दिला असून हे अधिकारी मनमानी करीत आहेत. अनुदानासाठी फक्त मराठी चित्रपट महामंडळाचे सदस्य अससेल्यांनाच प्राधान्य देऊन मराठी सिनेमा तयार करणाऱ्या अमराठी निर्मात्यांना अनुदानाच्या यादीतून बाहेर काढण्याचाही त्यांचा विचार सुरु आहे असा आरोपही टी. पी. अग्रवाल यांनी केला.

इम्पाने पाठवलेल्या या पत्रावर आता सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख काय विचार करतात हे लवकरच कळेल. पण एक मात्र नक्की की मराठी निर्मात्यांसाठी अखेर एका अमराठी निर्मात्यांच्या संस्थेलाच पुढाकार घ्यावा लागला आहे. मराठी कलाकार मात्र राजकीय पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन मिरवण्यात मग्न आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER