मी जबाबदार… की बेजबाबदार

Shailendra Paranjapeराजकारणात, समाजकारणात सर्वसामान्य लोकांना एखाद्या सामूहिक मोहिमेत सहभागी करून घेण्यासाठी काही घोषणा नेतेमंडळी देत असतात. ब्रिटिशांना भारतातून निघून जा, असे सांगण्यासाठी चले जाव किंवा क्विट इंडिया हा नारा दिला गेला. युसुफ मेहेरअली गवालिया टँकवरच्या मैदानावर १९४२ साली गेले होते ते शर्टाच्या खिशाला क्यू हे इंग्रजी अद्याक्षर लावून. त्यांना महात्मा गांधींनी हे काय लावले आहे असे विचारले आणि मेहेरअली यांनी हा क्यू म्हणजे ब्रिटिशांना क्विट असं सांगण्यासाठीचा आहे. लोकनेते अशा स्लोगन्स किंवा घोषणा अचूक हेरू शकतात कारण त्यांना लोकांची नस माहिती असते. ती त्यांना बरोब्बर ओळखता येत असते. क्विट इंडिया किंवा चले जाव किंवा छोडो भारत हे जनआंदोलन बनले. युसुफ मेहेरअली यांचा हा किस्सा यदुनाथ थत्ते यांनी सांगितलेला आहे.

घोषणा जनआंदोलन या सर्वांची आठवण यायचं कारण म्हणजे महाराष्ट्रात पुण्यात आंदोलनस्वरूप असलेले बेजबाबदार सामूहिक जनवर्तन. म्हणजे आता काय करोना संपलाय, कुठेय करोना, करोना तर दिवाळीच्या गर्दीतच चिरडून मेला, अशा भाषेत टिंगलटवाळी करत करोनाविषयक मास्क (Mask), सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) आणि सँनेटायझर ही त्रिसूत्री लोक विसरले. चहाची दुकानं ज्यांना पुण्यात अमृततुल्यवाले असं म्हटलं जातं, भेळ-पाववडा, भजी, डोसाउत्तप्पाच्या गाड्या, गरमागरम बटाटेवडे आणि धपाटे, पराठे, पावभाजीसह बहुतांश पदार्थ मिळणारी दुकाने, हॉटेल्स, न्याहारीच्या जागा आणि टपऱ्या या सर्वच ठिकाणी गर्दी लोटू लागली. पुण्यात संध्याकाळी हॉटेल्सबाहेरचे वेटिंग बघितले की पुण्याबाहेरचे अनेक मित्र विचारतात की पुणेकर संध्याकाळी घरी स्वयंपाक करीत नाहीत का…

हे सारं पुण्यात पुन्हा पूर्वीसारखंच सुरू झालं होतं. तीच गोष्ट ग्रामीण भागातली. तिकडे लग्नसोहळे म्हणजे पाव्हणेरावळे, नातंगोतं सांभाळावं लागतं, त्यामुळे गर्दी लोटू लागली. महाराष्ट्राच्या अनेक भागात हेच चित्र कमीअधिक फरकाने लोकांना दिसू लागले आणि त्यातून करोनाने पुन्हा डोके वर काढलेय. परिणामी विदर्भाच्या काही जिल्ह्यांमधे कडक निर्बंध लागू करण्यात आलेत. तीच गोष्ट इतरही भागात करावी लागेल, अशी चिन्हं आहेत. करोना उपाययोजना एपिडेमिक अँक्ट म्हणजे साथरोग नियंत्रण कायदा लागू करून केल्या जातात. साथरोग हे जणू युद्धच असते आणि त्यामुळे युद्धजन्य स्थिती आहे, याचे भान जनतेने कायम ठेवायला हवे आणि ते करोना पूर्ण हद्दपार होईपर्यंत.

जनआंदोलन, घोषणा यावरून करोनापर्यंत आलोय पण मूळ कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी केलेली आणखी एका योजनेची घोषणा. माझं कुटुंब माझी जबाबदारी, या ऐतिहासिक योजनेनंतर मुख्यमंत्र्यांनी मी जबाबदार ही योजना जाहीर केलीय. फेसबुक लाइव्हद्वारे त्यांनी जनतेशी संवाद साधला आणि लॉकडाऊन करायचा का, असा प्रश्न जनतेला केलाय. मी पुढच्या आठवडाभर याबद्दलची माहिती घेईन आणि करोनाविषयक निर्बंधांचे पालन करून रस्त्यावर येणारे लोक जास्ती असतील, तर लॉकडाऊन लावावा लागणार नाही आणि तुम्हाला लॉकडाऊन हवा असेल तर विनामास्क घराबाहेर पडाल, स्वच्छतेचे निकष पाळणार नाही आणि सोशल डिस्टन्सही पाळणार नाही, असं ठाकरे म्हणाले.

लोकांना हा एक प्रकारे अल्टिमेटमच आहे की येत्या आठवड्याभरात तुमचे वर्तन सुधारा. पण मुळात लोक मास्क न घालता फिरत होते, तेव्हा पोलिसांनी किंवा सरकारने काय केले, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे करोनाचे निर्बंध इमानदारीत जागरूकतेने पाळणाऱ्यांचा काय दोष, हे कळून येत नाही. पोल्यूटन्ट टू पे म्हणजे प्रदूषण करणाऱ्याने किंमत भोगावी, हे तत्त्व पर्यावरणविषयक निवाड्यांमधे पाळले दाते. तसेच सामाजिक पर्यावरणाच्या पातलीवर करोना पसरण्यासाठी कारणीभूत असलेल्यांमुळे नियम पाळणाऱ्या सर्वांनाही लॉकडाऊन भोगावा लागू शकतो. आपण करोना निर्बंध न पाळणाऱ्यांना पकडू शकत नाही, अशी कबुलीच एक प्रकारे मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली आहे. एकीकडे सीसीटीव्हीद्वारे पोलिसांची नजर सगळीकडे आहे, अशी शेकी मिरवली जात असतानाच पाचशे मोटारी टोल न भरता पुढे जातात, गुंडांच्या स्वागताला गर्दी होते, गुन्हे दाखल होतात आणि गुंड पोलिसांच्या हाती लागत नाहीत. तीच गोष्ट करोनाचे निर्बंध न पाळणाऱ्यांची आहे. एकीकडे करोना निर्बंध न पाळणाऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल झाला पण वाढले रुग्ण की लावा लॉकडाऊन आणि जरा कमी झाले की फिरा मोकळे, हे वागणं बरं न्हवं, हे जनतेनेही लक्षात घ्यायला हवं.

सरकार म्हणून काही यंत्रणा आहे की नाही, अशी शंका यावी, अशी स्थिती आहे. त्यामुळेच सरकार म्हणजे प्रतिक्रियावादी सुस्त व्यवस्था, असं सरकारचं स्वरूप झालंय कारण सरकार म्हणजे तीन दिशांना जाणारी तीन चाकं असलेली रिक्षा आहे का, असा प्रश्न पडतो. जनतेने मी जबाबदार असं म्हणून सगळं करायचं आणि अगदी करोनालाही पळवायचं, तर सरकार कशाला हवं. म्हणून तर मग सरकार जबाबदार, याऐवजी जनतेला ऐकवले जाते की जनताच जबाबदार….

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer  : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER