मी प्रकाश आंबेडकरांना पुन्हा खांद्यावर उचलून घेण्यास तयार : असदुद्दीन ओवेसी

Asaduddin Owaisi

मुंबई : आम्ही वंचितसोबत केवळ निवडणुकीसाठी आघाडी केली नव्हती. मी प्रामाणिकपणे बाळासाहेबांना खाद्यांवर उचलून घेतले होते. आजही माझी त्यांना खांद्यावर उचलून घेण्याची तयारी आहे. तुम्ही बाळासाहेबांना (प्रकाश आंबेडकर) समजवा,”असे आवाहन एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी वंचितच्या पदाधिकाऱ्यांना केले आहे .

औरंगाबादमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेल्या एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांची वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी ते बोलत होते .

आजही वंचितसोबत आघाडी करायला तयार आहे. बाळासाहेबांना कोण काय बोलले हे मला माहिती नाही. तुम्ही त्यांना समजवा. औरंगाबाद मध्य मधून आमचा विद्यमान आमदार आहे. असे असताना आम्ही ती जागा कशी सोडणार. शहरात वंचितचा आमदार हवा ही मागणी रास्त आहे. त्यासाठी आम्ही पश्चिमची जागा सोडण्यास तयार होतो. या जागेवरूनही जलील माझ्याशी भांडले. पण, मी त्यांची समजूत काढली. मी त्यांना म्हणालो आपल्याला वंचितसोबत आघाडी करायची आहे. पश्चिमची जागा द्यावी लागेल,” असं ओवेसी वंचितच्या पदाधिकाऱ्यांशी एका व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे .

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एआयएमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीची युती तुटल्याची घोषणा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केली होती. मात्र आता ओवेसी यांच्या वक्तव्याने वंचित बहुजन आघाडीची युती पुन्हा होण्याची दाट शक्यता आहे . वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांनी समाधानकारक जागा न दिल्याने एमआयएमने नाराजी दर्शविली होती .

वंचित आघाडी आणि एमआयएमसोबत लढले तर राज्यात दोन्हींचे मिळून १५ आमदार निवडून येतील. त्यानंतर इतरांचा पाठिंबा घेऊन आपण प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेवर पाठवू शकतो. माझ्या मनात काहीच नाही. तुम्ही तुमचं मन साफ ठेवा. औरंगाबाद मध्य मधून माघार घ्यायला लावा,” असेही ओवेसी म्हणाले.

दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या चर्चेदरम्यान एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीतील दुफळी बाहेर येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर सन्मानजनक जागा न दिल्याने एमआयएमने वेगळे होण्याचा निर्णय घेत युती तुटल्याची घोषणा केली होती. “२८८ पैकी ८ जागा एमआयएमसाठी सोडत असल्याने युती तोडत आहे.” असे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले होते. तसेच “वंचितसोबतची युती तोडण्याचा मोठा निर्णय मी पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या परवानगीशिवाय घेऊ शकत नाही. हा निर्णय पक्षाचे अध्यक्ष ओवेसी यांनीच घेतला आहे.” असे जलील म्हणाले होते.